‘त्या’ दोन भगिनींचा प्रजासत्ताकदिनी गौरव
By Admin | Updated: December 1, 2014 23:55 IST2014-12-01T23:55:13+5:302014-12-01T23:55:13+5:30
रोहतक येथे हरियाणा रोडवेजच्या बसमध्ये छेड काढणाऱ्या तीन मजनूंना चोप देणाऱ्या दोन भगिनींचा गणराज्यदिनी गौरव केला जाणार आहे
‘त्या’ दोन भगिनींचा प्रजासत्ताकदिनी गौरव
चंदीगड : रोहतक येथे हरियाणा रोडवेजच्या बसमध्ये छेड काढणाऱ्या तीन मजनूंना चोप देणाऱ्या दोन भगिनींचा गणराज्यदिनी गौरव केला जाणार आहे. या घटनेत बघ्याची भूमिका घेणारा बसचालक व वाहक यांना निलंबित करण्यात आले आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची खातरजमा केली जावी, असा आदेश हरियाणा सरकारने पोलीस महासंचालक आणि वाहतूक विभागाला दिला आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या या दोन भगिनींनी दाखविलेल्या धाडसाबद्दल त्यांचा प्रजासत्ताकदिनी रोख रक्कम देऊन सत्कार केला जाईल, असे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले. या दोन भगिनी बसमधून प्रवास करीत असताना तीन तरुणांनी त्यांची छेड काढली होती. त्यावेळी अन्य प्रवासी केवळ बघ्याची भूमिका बजावत होते. त्यापैकी एकीने युवकांना बेल्टने चोप दिला.
एका प्रवाशाने मोबाईल फोनवर ही घटना रेकॉर्ड केल्यानंतर सोशल मीडियावर ती व्हायरल झाली. कुलदीप, मोहित आणि दीपक असे नाव असलेल्या या तीन तरुणांना अटक करण्यात आली असून, ६ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष ललिता कुमारमंगलम यांनी या दोन बहिणींचे अभिनंदन करताना छेडखानी करणाऱ्या लोकांना सामोरे जाण्याचे धाडस काही मुलींमध्येच असते, असे म्हटले. (वृत्तसंस्था)