नवी दिल्ली : महाकुंभ हे खरे तर ‘एकतेचे महाकुंभ’ असल्याचे सांगून या भव्य अशा धार्मिक उत्सवातून सर्वांनी समाजातील द्वेष आणि फूट नष्ट करण्याचा संकल्प मनी घेऊन परतावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. मासिक ‘मन की बात’मध्ये बोलताना मोदी यांनी पुढील वर्षी १३ जानेवारीपासून प्रयागराजमध्ये सुरू होत असलेल्या महाकुंभमध्ये सहभागी लोकांच्या माध्यमातून विविधतेतील एकता दिसत असल्याचे सांगितले. या धार्मिक महोत्सवाची भव्यता त्याच्या विविधतेतच असल्याचे ते म्हणाले.
दर १२ वर्षांनी अशा महाकुंभचे आयोजन केले जाते. यात लाखोंच्या संख्येने धार्मिक भावनेतून लोक एकत्र येतात. विविध संतांसह हजारो परंपरा, शेकडो संप्रदाय आणि कित्येक आखाडे या महाकुंभमध्ये सहभागी होतात. तरी कुठेही भेदभावाचा लवलेश नसतो. येथे कुणी लहान, कुणी मोठा नसतो. विविधतेतून एकतेचे असे जगात दुसरे उदाहरण असू शकत नाही. म्हणूनच हा कुंभ एकतेचा महाकुंभ असतो, असे मोदी यांनी नमूद केले.
प्रथमच चॅटबोटचा वापर- यंदा प्रथमच अशा महाकुंभच्या आयोजनात ‘एआय चॅटबोट’चा वापर केला जाणार आहे.- याशिवाय डिजिटल दिशादर्शक प्रणालीची सुविधा पुरवली जाणार असल्याने भाविकांना वेगवेगळ्या मंदिरांत, विविध घाटांवर तसेच साधूंच्या आखाड्यांवर पोहोचण्यात मदत होईल.- ‘एआय चॅटबोट’च्या माध्यमातून महाकुंभाची माहिती ११ भाषांत उपलब्ध असेल, असेही मोदी यांनी सांगितले.