पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे भारतावर बिनबुडाचे आरोप करण्याचे नाटक पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर उघड झाले आहे. मंगळवारी इस्लामाबाद येथील न्यायालयाबाहेर झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा दोष भारतावर लादल्याबद्दल, भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देशातील लष्करी प्रेरणेने चाललेल्या घटनात्मक बंडाळीवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान अशा खोट्या कथा रचत असल्याची सडेतोड टीका भारताने केली आहे.
मंगळवारी इस्लामाबादमधील एका न्यायालयाच्या बाहेर आत्मघाती हल्ला झाला. एका आत्मघाती हल्लेखोराने स्वतःला बॉम्बने उडवून दिले. हल्लेखोराला कोर्टाच्या आवारात प्रवेश करता आला नाही, त्यामुळे त्याने मुख्य फाटकाजवळ पोलीस वाहनाजवळ स्फोट घडवला. या भीषण हल्ल्यात कमीतकमी १२ लोकांचा मृत्यू झाला आणि २७ हून अधिक जखमी झाले. विशेष म्हणजे, या हल्ल्याची जबाबदारी 'तहरीक-ए-तालिबान' या दहशतवादी गटाने आधीच घेतली आहे.
मात्र, या दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी लगेचच 'भारत कार्ड' बाहेर काढले. पाकिस्तानच्या वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार शरीफ म्हणाले, "हे हल्ले भारत पुरस्कृत दहशतवादाचाच एक भाग आहेत, ज्याचा उद्देश पाकिस्तानला अस्थिर करणे आहे. भारतीय संरक्षणात अफगाणिस्तानच्या भूमीतून होत असलेल्या या हल्ल्यांचा जितका निषेध करावा तितका कमी आहे."
भारताकडून थेट उत्तर
शहबाज शरीफ यांच्या या आरोपांना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी तात्काळ आणि अत्यंत कठोर भाषेत प्रत्युत्तर दिले. रणधीर जयस्वाल यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, "भारत, भ्रमात जीवन जगणाऱ्या पाकिस्तानी नेतृत्वाने लावलेले हे निराधार आरोप स्पष्टपणे फेटाळतो. देशात सध्या सुरू असलेल्या लष्करी-प्रेरित घटनात्मक मोडतोडी आणि सत्ता बळकावण्याच्या प्रयत्नांकडून स्वतःच्या लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भारताविरुद्ध खोट्या कथा रचणे, ही पाकिस्तानची नेहमीची आणि अपेक्षित चाल आहे. जगभरातील लोकांना पाकिस्तानचे हे सत्य माहीत आहे. पाकिस्तानच्या या हताशपणे लक्ष विचलित करणाऱ्या युक्त्यांनी आता कुणालाही गैरसमज होणार नाही."
Web Summary : Pakistan accused India of involvement in the Islamabad blast, a claim India strongly refuted. India stated Pakistan deflects attention from internal issues by making false accusations. A terrorist group claimed responsibility for the blast.
Web Summary : पाकिस्तान ने इस्लामाबाद विस्फोट में भारत को शामिल होने का आरोप लगाया, जिसका भारत ने कड़ा खंडन किया। भारत ने कहा कि पाकिस्तान झूठे आरोप लगाकर आंतरिक मुद्दों से ध्यान भटकाता है। एक आतंकवादी समूह ने विस्फोट की जिम्मेदारी ली।