नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर जोरदार टीका केली. ही घटना केवळ राष्ट्रपतींचा अपमान नसून, भारताच्या संविधान आणि लोकशाहीच्या भावनेवर आघात असल्याचे त्यांनी म्हटले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रविवारी दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सुमारे 33,500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करत होते. यावेळी आयोजित जनसभेला संबोधित करताना त्यांनी पश्चिम बंगाल सरकारवर निशाणा साधला.
राष्ट्रपतींचा घोर अपमान
पंतप्रधान मोदी म्हणाले, आज देश आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहे, पण काल पश्चिम बंगालमध्ये टीएमसी सरकारने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा घोर अपमान केला. त्या संथाल समाजाच्या मोठ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी बंगालमध्ये गेल्या होत्या. मात्र त्यांचा सन्मान करण्याऐवजी टीएमसीने या पवित्र कार्यक्रमाचा बहिष्कार केला.
संविधानाच्या भावनेचा अपमान
मोदी पुढे म्हणाले की, द्रौपदी मुर्मू स्वतः आदिवासी समाजातून आलेल्या आहेत आणि त्या नेहमीच आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात. तरीही राज्य सरकारने या कार्यक्रमाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले नाही. हे केवळ राष्ट्रपतींचा अपमान नाही, तर भारताच्या संविधानाचा आणि लोकशाहीच्या महान परंपरेचाही अपमान आहे.
टीएमसीचा अहंकार लवकरच चकनाचूर होईल
पंतप्रधान मोदी यांनी टीएमसी सरकारवर टीका करताना म्हटले की, सत्तेचा अहंकार कोणाचाही टिकत नाही. टीएमसीचे गलिच्छ राजकारण आणि सत्तेचा अहंकार, ज्यामुळे एका आदिवासी महिला राष्ट्रपतींचा अपमान झाला, तो बंगालची जनता लवकरच चकनाचूर करेल. पश्चिम बंगालमधील जागरूक जनता, देशातील महिला आणि आदिवासी समाज टीएमसीला हा अपमान कधीही माफ करणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
नेमका वाद काय?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उत्तर बंगाल दौऱ्यावर असताना दार्जिलिंग जिल्ह्यातील 9व्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेत मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाल्या होत्या. सुरुवातीला हा कार्यक्रम फांसीदेवा ब्लॉकमधील बिधाननगर येथे होणार होता, जिथे मोठ्या प्रमाणावर संथाल आदिवासी समाजातील लोक उपस्थित राहू शकले असते. मात्र राज्य प्रशासनाने सुरक्षा, गर्दी आणि इतर कारणे सांगत कार्यक्रमाचे ठिकाण बागडोगरा विमानतळाजवळील गोसाईंपूर येथे हलवले. राष्ट्रपतींनी या बदलाबाबत नाराजी व्यक्त करत नवीन ठिकाण लहान असल्याने अनेकांना कार्यक्रमात सहभागी होता आले नसल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा राज्यातील कोणताही मंत्री त्यांना स्वागतासाठी उपस्थित नसल्याबद्दलही प्रश्न उपस्थित झाले.
ममता बॅनर्जींनी आरोप फेटाळले
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, संबंधित कार्यक्रमाबाबत राज्य सरकारला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती. या मुद्द्यावरून सध्या भाजप आणि टीएमसी यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.
Web Summary : PM Modi criticized West Bengal's TMC government over protocol breaches during President Murmu's visit. He deemed it an insult to the constitution and democracy, citing the altered event venue and absence of state officials. Mamata Banerjee refuted the claims, sparking political clashes.
Web Summary : पीएम मोदी ने राष्ट्रपति मुर्मू की यात्रा के दौरान प्रोटोकॉल उल्लंघन पर पश्चिम बंगाल की टीएमसी सरकार की आलोचना की। उन्होंने इसे संविधान और लोकतंत्र का अपमान बताया, कार्यक्रम स्थल बदलने और राज्य के अधिकारियों की अनुपस्थिति का हवाला दिया। ममता बनर्जी ने आरोपों का खंडन किया, जिससे राजनीतिक टकराव शुरू हो गया।