ही तर मनुस्मृतीविरुद्ध संविधानाची लढाई; राहुल गांधी यांचे लोकसभेत चर्चेवेळी कठोर टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 05:31 IST2024-12-15T05:29:31+5:302024-12-15T05:31:05+5:30
सावरकरांनी संविधानात कोणतीच बाब भारतीय नसल्याचे म्हटले होते. सावरकरांनी संविधानाच्या तुलनेत मनुस्मृतीलाच महत्त्व दिले होते, असे राहुल गांधी म्हणाले.

ही तर मनुस्मृतीविरुद्ध संविधानाची लढाई; राहुल गांधी यांचे लोकसभेत चर्चेवेळी कठोर टीकास्त्र
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी लोकसभेत संविधानावर चर्चेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या एका भाष्याचा हवाला देत, भाजप तसेच केंद्र सरकारवर कठोर टीका केली. एकलव्याचा जसा अंगठा कापून घेतला गेला, तसेच देशातील युवकांचे अंगठे कापले जात आहेत, असे सांगून आज देशात 'संविधान विरुद्ध मनुस्मृती' अशी लढाई असल्याचे त्यांनी नमूद केले.
संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवयात्रेवर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होताना राहुल गांधी यांनी दावा केला की, सावरकरांनी संविधानात कोणतीच बाब भारतीय नसल्याचे म्हटले होते. सावरकरांनी संविधानाच्या तुलनेत मनुस्मृतीलाच महत्त्व दिले होते, असेही राहुल म्हणाले.
याच संसदेत आम्ही जात जनगणना लागू करू, असे वचन दिले होते. ५० टक्के आरक्षणाची भिंत आम्ही पाडून दाखवू, असा पुनरुच्चारही राहुल यांनी केला.
एकलव्याचा दाखला
एकलव्याने जशी तपस्या केली होती तसे देशातील युवक सकाळ- पासून वेगवेगळ्ळ्या परीक्षांची तयारी करतात. मात्र, सरकारने 'अग्निवीर' लागू केले आणि एकप्रकारे युवकांचा अंगठाच कापला. देशात परीक्षेचे पेपर फुटतात तेव्हा एक प्रकारे युवकांचे अंगठेच कापले जातात, असेही ते म्हणाले.
'...हा तर सावरकरांचा अपमान'
सत्ताधारी पक्षाचे लोक संविधान रक्षणाच्या गोष्टी करतात, म्हणजे ते आपले 'सर्वोच्च नेते' सावरकर यांचा एकप्रकारे अपमानच करतात, अशी टीका राहुल यांनी केली. विरोधी पक्ष सत्तेत आल्यानंतर जातीय जनगणना करील आणि आरक्षणाचा ५० टक्क्यांचा अडथळाही दूर करील, असे राहुल गांधी म्हणाले.
'शेतकऱ्यांचा अंगठा कापण्याचे काम करता...'
आपण एका उद्योगपतीला जेव्हा धारावी प्रकल्प, बंदरे आणि विमानतळांची कामे देता, तेव्हा एक प्रकारे देशाचा अंगठाच कापता. शेतकरी किमान हमीभावाची मागणी करतो, तेव्हा आपण दोन बड्या उद्योगपतींनाच लाभ देत शेतकऱ्यांचा अंगठा कापण्याचे काम करता. इंदिरा गांधी यांना मी सावरकर यांच्याबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले होते की, सावरकरांनी इंग्रजांशी जुळवून घेत लेखी माफी मागितली होती. तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, महात्मा गांधी, पंडित नेहरू तुरुंगात गेले; परंतु सावरकरांनी माफी मागितली होती.