जम्मू आणि काश्मीरमधील रामबन येथे मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला. तर बचाव पथकाने १०० लोकांचा जीव वाचवला आहे. अनेक वाहनं अजूनही ढिगाऱ्यात अडकली आहेत. घरं आणि दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. रामबन येथील दुकानदार रवी कुमार म्हणाले की, त्यांची दोन दुकानं होती, पण ती एका रात्रीत गायब झाली.
"संपूर्ण बाजारपेठ वाहून गेली"
रामबन येथील रहिवासी ओम सिंह यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, "मी दुसऱ्या बाजूला राहतो, पण तिथेही पाण्याचा प्रवाह खूप वेगवान होता, आम्ही वेळेवर येथे पोहोचू शकलो नाही. जेव्हा मी येथे पोहोचलो तेव्हा मला दिसले की माझ्या दुकानासह संपूर्ण बाजारपेठ अचानक गायब झाली होती. असं काहीतरी मी पहिल्यांदाच पाहत आहे." रामबन येथील दुकानदार रवी कुमार म्हणाले, "माझी बाजारात दोन दुकानं होती. जेव्हा आम्हाला सकाळी चार वाजता कळलं की संपूर्ण बाजारपेठ वाहून गेली आहे, तेव्हा आम्ही येथे पोहोचलो आणि आढळलं की येथे काहीही शिल्लक राहिलेलं नाही."
"आता आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन"
"एका रात्रीत सर्व काही उद्ध्वस्त झालं. मदतीसाठी कोणाशी संपर्क साधावा किंवा काय करावं हे आम्हाला माहित नव्हतं. आम्हाला काहीच समजत नव्हतं. ही दुकानं आमच्या उपजीविकेचं एकमेव साधन होती. आता आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन. मी सरकारला विनंती करतो की, त्यांनी येऊन आम्हाला मदत करावी. ते खूपच भयानक दृश्य होतं, कल्पनेच्या पलीकडंच... आमचं कर्ज माफ व्हावं कारण आमच्याकडे आता काहीही शिल्लक नाही." रामबनचे एसएसपी कुलबीर सिंह यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आहे आणि धरम कुंडमधून सुमारे १०० लोकांना वाचवण्यात आले आहे अशी माहिती दिली.
ढिगाऱ्यात अडकली अनेक वाहनं
रामबन येथील रहिवासी सुनील कुमार यांना भूस्खलनामुळे त्यांच्या कारचं खूप नुकसान झालं आहे यावर विश्वास बसत नाही. त्यांनी एएनआयला सांगितलं की, "मी जम्मूहून श्रीनगरला जात होतो. पाऊस पडत असल्याने मी रामबनमध्ये एक हॉटेल बुक केलं होतं. ३ वाजता ही घटना घडली. जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा मला दिसलं की हॉटेलचे दोन मजले ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. वरच्या मजल्यावर सुमारे १५ लोक होते. आम्ही त्या सर्वांना वाचवलं. भूस्खलनामुळे माझी नवीन गाडी पूर्णपणे खराब झाली आहे. ढिगाऱ्याखाली सुमारे ८-१० गाड्या आहेत."