कोणाची चौकशी करावी हे चोराने सांगू नये - भाजपाचे केजरीवाल यांना प्रत्युत्तर
By Admin | Updated: February 3, 2015 16:23 IST2015-02-03T16:20:05+5:302015-02-03T16:23:36+5:30
बोगस कंपन्यांकडून निधी स्वीकारण्यावरुन आप आणि भाजपामध्ये सुरु असलेले शाब्दिक युद्ध मंगळवारी शिगेला पोहोचले.

कोणाची चौकशी करावी हे चोराने सांगू नये - भाजपाचे केजरीवाल यांना प्रत्युत्तर
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - बोगस कंपन्यांकडून निधी स्वीकारण्यावरुन आप आणि भाजपामध्ये सुरु असलेले शाब्दिक युद्ध मंगळवारी शिगेला पोहोचले. आपवर आरोप करणारी सामाजिक संस्था आणि सर्व राजकीय पक्षांच्या देणग्यांची चौकशी व्हावी अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली असतानाच केंद्रीय मंत्री व भाजपा नेत्या निर्मला सीतारमन यांनी 'चोराने कोणाचा तपास करावा हे सांगू नये' अशा तिखट शब्दात केजरीवाल यांना प्रत्युत्तर दिले.
सोमवारी आवाम नामक संस्थेने आम आदमी पक्षाने बोगस कंपन्यांकडून दोन कोटी रुपयांचा निधी स्वीकारल्याचा आरोप केला होता. यानंतर मंगळवारी सकाळी आम आदमी पक्षाने सुप्रीम कोर्टाद्वारे सर्व राजकीय पक्षांच्या देणग्यांची चौकशी व्हावी अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली होती. यासाठी आम आदमी पक्षातर्फे आज सकाळी सुप्रीम कोर्टाकडे अर्जही दिला जाणार होता. मात्र अद्याप अर्ज देण्यात आलेला नाही. तसेच आपवर आरोप करणा-या संस्थेची चौकशी करावी अशी मागणीही आपने केली आहे. आपच्या या मागणीवर केंद्रीय राज्यमंत्री निर्मला सीतारमन यांनी अत्यंत तिखट शब्दात प्रत्युत्तर देताना केजरीवाल यांना चोर असे संबोधित केल्याने वाद निर्माण झाला आहे. 'सीतारमन केजरीवाल यांना चोर म्हणत असतील तर यात नवीन काहीच नसून अशा आक्षेपार्ह शब्दात टीका करण्याची भाजपाला सवय आहे' अशी प्रतिक्रिया आपचे प्रवक्ते आशुतोष यांनी केला आहे. दरम्यान, मंगळवारीही अवामने आपविरोधात नवीन आरोप केले आहेत. आप काळा पैसा देणगी म्हणून स्वीकारुन त्याला व्हाइट मनी करत आहे असा आरोप अवामने केला आहे.