मोदी सरकार ३.० चा अर्थसंकल्प शनिवारी (१ फेब्रुवारी) सादर झाला. यानंतर, यावर विविध स्थरांतून, विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही येत आहेत. यातच, राहुल गांधी यांचीही प्रतिक्रिया आली. त्यांनी अर्थसंकल्पाचे वर्णन 'बुलेटच्या जखमेवर बँड-एड', असे केले होते. याला आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांना भारतीय अर्थव्यवस्थेचे ज्ञान नाही, असे सरमा यांनी म्हटले आहे.
"60 वर्षांत 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्नही टॅक्स फ्री करू शकले नाही"राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "काँग्रेसने या अर्थसंकल्पावर टीका करू नये. मध्यमवर्गीयांना किती लाभ झाला आहे हे त्यांनी बघायला हवे. ६० वर्षांच्या राजवटीत काँग्रेसला ५ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्नही करमुक्त करता आले नाही आणि केंद्र सरकारने थेट १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले.
आसामचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "अर्थमंत्र्यांनी केवळ मध्यमवर्गीयांनाच दिलासा दिला नाही, तर अनेक तंत्रज्ञानही करमुक्त केले आहे. तेसेच अनेक कर्करोगाच्या औषधांवरील करही कमी केला आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य राजकीय आहे. त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेचे काहीही ज्ञान नाही."
काय म्हणाले होते राहुल गांधी? - काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना, या अर्थसंकल्पावर टीका केली. तसेच, हा अर्थसंकल्प म्हणजे, 'बुलेटमुळे झालेल्या जखमेवर बँड-एड' लावण्यासारखे असल्याचे म्हणाले होते. याशिवाय, "जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपल्या आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी काही आदर्श बदल आवश्यक होते. मात्र, हे सरकार सुधारणांचा विचार करण्याच्या बाबतीत दिवाळखोर आहे,' असेही राहुल गांधी यांनी म्हटले होते.