‘ते माझे आई-वडील नाहीत!’
By Admin | Updated: August 6, 2015 02:22 IST2015-08-06T02:22:10+5:302015-08-06T02:22:10+5:30
रेल्वेने चुकून पाकिस्तानात गेल्यानंतर १५ वर्षे तेथेच अडकून पडलेली मूकबधिर गीता ही आपली मुलगी आहे, असा दावा अमृतसर येथील एका दाम्पत्याने बुधवारी केल्याने

‘ते माझे आई-वडील नाहीत!’
नवी दिल्ली : रेल्वेने चुकून पाकिस्तानात गेल्यानंतर १५ वर्षे तेथेच अडकून पडलेली मूकबधिर गीता ही आपली मुलगी आहे, असा दावा अमृतसर येथील एका दाम्पत्याने बुधवारी केल्याने कराचीत एधी फाउंडेशन सांभाळ करीत असलेल्या या मुलीला अखेर तिच्या घरी परत पाठविता येईल, अशी आशा बुधवारी निर्माण झाली. पण हे आपले आई-वडील नाहीत, असे गीताने सांगितले आहे.
भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त टीसीए राघवन आणि त्यांच्या पत्नीने मंगळवारी कराचीत एधी फौंडेशनच्या शेल्टर होममध्ये जाऊन गीताची भेट घेतली. तिला पाहून व तिच्याशी बोलून ती भारतीय असल्याचे उच्चायुक्तांना वाटते. तिला भारतात परत आणले जाईल, असे टिष्ट्वट परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी रात्री केले.
या पार्श्वभूमीवर अमृतसर येथील राजेश कुमार आणि राम दुलारी या दाम्पत्याने त्यांचा १४ वर्षांचा मुलगा राजू याच्यामार्फत दिल्लीतील एका इंग्रजी वृत्तपत्राशी संपर्क साधून जिला ‘गीता’ म्हटले जाते ती आपली मुलगी पूजा असल्याचा व आपण तिला ‘गुड्डी’ म्हणत असल्याचा दावा केला.
ही बातमी एका खासगी वृत्तवाहिनेने या दाम्पत्याच्या छायाचित्रांसह प्रक्षेपित केली. या वृत्तवाहिनेने कराचीत एधी फौंडेशनशी संपर्क साधला. फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती गीताला दिली व राजेश कुमार आणि राम दुलारी यांचे फोटो तिला दाखविले. गीताने ते फोटा न्याहाळले व त्यातील व्यक्तींना आपण ओळखत नसल्याचे खाणाखुणा करून दुभाषीला सांगितले.
मजेची गोष्ट अशी की, राम दुलारी आणि गीता यांच्या चेहरेपट्टीत खूप साम्य दिसते. पण गीताच्या म्हणण्यानुसार तिची आई व घरातील इतर स्त्रिया साडी नेसणाऱ्या आहेत. पण फोटोतील राम दुलारीने पंजाबी धाटणीचे सलवार-खमीस परिधान केलेले आहे.
राजेश कुमार व राम दुलारी हे दाम्पत्यही गीताप्रमाणेच मूक-बधिर आहे. त्यांचा मुलगा राजू याने उपर्युक्त इंग्रजी वृत्तपत्रास सांगितले की, आमचे कुटुंब बऱ्याच वर्षांपूर्वी बिहारमधून अमृतरमध्ये आले. तेथे आम्ही रेल्वे स्टेशन व परिसरात कचरा वेचून व भीक मागून पोट भरतो.
आपली बहिण पूजा (गीता) सुमारे १० वर्षांपूर्वी अमृतसर रेल्वे स्टेशनवरून बेपत्ता झाली होती, असा दावाही राजूने केला.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे एक कर्मचारी कुलदीप सिंग यांनीही राजूच्या या म्हणण्याला दुजोरा दिल्याचे वृत्त या इंग्रजी वृत्तपत्राने दिले. सुवर्ण मंदिरास भेट देण्यासाठी येणाऱ्या यात्रेकरूंना अमृतसर रेल्वे स्टेशनवर मदत व मार्गदर्शन करण्याचे काम कुलदीप सिंग १९९८ पासून करतात. पाकिस्तान व भारतातील शीख यात्रेकरू एकमेकांच्या देशांमधील पवित्र गुरुव्दारांचे दर्शन घेण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान चालणाऱ्या रेल्वेने ये-जा करीत असतात. या मुलीला अमृतसर रेल्वे स्टेशनवर तसेच रेल्वे गाड्यांमध्ये भीक मागताना पूर्वी आपण पाहिले होते, असे कुलदीप सिंग सांगतात. एखाद्या शीख जत्थ्यासोबत ती चुकून रेल्वेने पाकिस्तानात गेली असावी, असे त्यांना वाटते. (लोकमत न्यज नेटवर्क)