Piyush Goyal on H-1B Visa: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसाचे शुल्क वाढवून भारतीयांच्या चिंतेत आणखी भर टाकली आहे. ट्रॅरिफच्या मुद्द्यावरुन तणाव असतानाच व्हिसाचे शुल्क वाढवल्याने राजकीय वादळ निर्माण केले आहे. हा व्हिसाचा वापर बहुतेक भारतीय करतात त्यामुळे विरोधी पक्षही सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. दुसरीकडे, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ट्रम्प प्रशासनावर या निर्णयावर टीका केली आहे. अमेरिका आमच्या प्रतिभेला घाबरत आहेत, म्हणूनच ते असे करत असल्याचे पियुष गोयल म्हणाले.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एच-१बी व्हिसा शुल्क १००,००० डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. "जग भारतीय प्रतिभेला थोडे घाबरते. जगभरातील विविध देशांनाही भारतासोबत मुक्त व्यापार करार करायचे आहेत.हे देश भारतासोबत व्यापार वाढवू इच्छितात आणि संबंध सुधारू इच्छितात. आमच्या प्रतिभेमुळे ते थोडे घाबरतात. आम्हाला यावरही काही आक्षेप नाही," असं पियुष गोयल म्हणाले.
अमेरिकेतील वाढत्या समस्या लक्षात घेऊन, केंद्रीय मंत्र्यांनी तिथल्या भारतीयांना आवाहन केले. त्यांनी भारतीय डायस्पोराला भारतात येऊन नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचे आणि भारतात नवीन गोष्टी डिझाइन करण्याचे आवाहन केले. जर असे झाले तर आपली अर्थव्यवस्था आणखी वेगाने वाढेल असे ते म्हणाले. या प्रकरणात काहीही झाले तरी आपणच शेवटी विजेते होऊ, असेही केंद्रीय मंत्री म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी असे अनेक निर्णय घेतले आहेत ज्यामुळे भारताचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामध्ये व्यापार शुल्क वाढीचाही समावेश आहे. ऑगस्टमध्ये व्यापार कराराच्या वाटाघाटी थांबण्याचे हेच कारण आहे. या शुल्कानंतर, ट्रम्प प्रशासनाने एच-१बी व्हिसा नियम कडक केले आहेत, ज्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता, वाढलेल्या एच-१बी व्हिसा शुल्कामुळे भारतीय व्यावसायिकांना अमेरिकेत काम करणे अधिक महाग होईल.