हे आहेत जगातील '१०' बुद्धिमान देश
By Admin | Updated: June 14, 2016 12:50 IST2016-06-14T12:46:15+5:302016-06-14T12:50:55+5:30
अमेरिकेतील गॅझेट रिव्ह्यू' कंपनीने बुद्धिमत्ता, शिक्षण व्यवस्था व काही चाचण्यांच्या आधारे एक सर्व्हे केला असून त्याद्वारे २०१६ सालातील जगातील १० बुद्धिमान देशांची नावे जाहीर केली आहेत.

हे आहेत जगातील '१०' बुद्धिमान देश
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १४ - अमेरिकेतील मिन्नेआपोलिस या शहरातील 'गॅझेट रिव्ह्यू' कंपनीने बुद्धिमत्ता, शिक्षण व्यवस्था व काही चाचण्यांच्या आधारे एक सर्व्हे केला असून त्याद्वारे जगातील १० बुद्धिमान देशांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकावर हाँगकाँग, दुस-या स्थानी दक्षिण कोरिया व तिस-या क्रमांकावर जपान असून शेवटच्या म्हणजेच १० व्या स्थानावर स्वीडन हा देश आहे.
हाँगकाँग - या लिस्टमध्ये एक देश म्हणून 'हाँगकाँग'च्या नावाचा समावेश कारावा की नाही यावरून बरेच चर्वितचर्वण झाले कारण तसं पहायला गेलं तर 'हाँगकाँग' हा चीनच्या अधिपत्याखाली येतो. मात्र असं असलं तरीही इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत हाँगकाँगमधील विद्यार्थी गणित व विज्ञानातील चाचणीमध्ये दुस-या स्थानावर असून फिनलँडनंतर सर्वोत्तम शिक्षण व्यवस्था हाँगकाँगमध्येच आहे. तसेच हाँगकाँगचा सरासरी बुध्यांक १०७ इतका आहे.
दक्षिण कोरिया - हा देश जगातील सर्व इतर देशांपेक्षा अतिशय अभिनव कल्पना राबवणारा असून तेथील विद्यार्थी सर्व चाचण्यांमध्ये तिस-या क्रमांकावर आहेत. तसेच या देशात संशोधन व विकास प्रकल्पांवर बराच खर्चही करण्यात येतो. दक्षिण कोरियामध्ये जगातील सर्वात वेगवान व विश्वसनीय इंटरनेट असल्याचेही म्हटले जाते. मात्र असे असले तरीही दक्षिण कोरियामधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा दरही खूप उच्च आहे. या देशाचा सरासरी बुध्यांक आहे १०६
जपान - दुस-या महायुद्धात संपूर्णपणे बेचिराख झाल्यानंतर फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेणा-या जपानचा सर्वाधिक बुद्धिमान देशांच्या यादीत समावेश झाला नसता तरच नवल वाटले असते. दुर्दम्य महत्वाकांक्षा आणि अथक मेहनतीच्या जोरावर पुन्हा उभा राहिलेला हा देश या यादीत चौथ्या स्थानावर आहे. जपानमधील ' टोकियो' युनिव्हर्सिटी ही जगातील सर्वोत्तम युनिव्हर्सिटींपैकी एक असून आशियातील अव्वल युनिव्हर्सिटी म्हणून नावाजली जाते. जपानमधील साक्षरेतेचे प्रमाण ९९ टक्के येथील नागरिकांचे आयुष्यमान सर्वाधिक असते. जपानचा सरासरी बुध्यांक आहे १०५.
तैवान - जपानप्रमाणेच तैवान हाही या यादीत चौथ्या स्थानावर आहे. प्रगत तंत्रज्ञानासाठी व सार्वजनिक शिक्षण प्रणालीसाठी प्रसिद्ध असलेल्या तैवानचा सरासरी बुध्यांक १०४ इतका आहे.
सिंगापूर - जगातील गणित व विज्ञान क्षेत्रातील कामगिरीत सिंगापूरमधील विद्यार्थी नेहमीच अव्वल ठरतात. सिंगापूरचा सरासरी बुध्यांक आहे १०३ आहे.
नेडरलँडस - नेदरलँड्समध्ये लहान मुलांसाठी जगातील सर्वांत चांगली शिक्षण पद्धती आहे. या देशाचा सरासरी बुध्यांक आहे १०३.
इटली - इटलीला विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पनांची शेकडो वर्षांची परंपरा आहे. महान शिल्पकार, चित्रकार, लेखक व कवींचा वारसा सांगणारा हा देश आता गणित, विज्ञान, भौतिकशास्त्रासह इतर अनेक क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती करत आहे. इटलीचा सरासरी बुध्यांक आहे १०२.
जर्मनी - अनेक महान विचारवंताचा वारसा सांगणा-या जर्मनीत तत्वज्ञान, विज्ञान, कलेसह ब-याच क्षेत्रात अनेक महत्वपूर्ण व्यक्ती होऊन गेल्या. जर्मनीचा सरासरी बुध्यांक १०२ इतका आहे.
ऑस्ट्रिया - जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षण व्यवस्था असलेल्या देशांमध्ये ऑस्ट्रियाचा समावेश होतो. तसेच पीएचडी पदवी मिळवणा-यांमध्ये ऑस्ट्रियाचा जगात दुसरा क्रमांक लागतो. ऑस्ट्रियाचाही सरासरी बुध्यांक आहे १०२.
स्वीडन - स्वीडनमध्येही सर्वात चांगली शिक्षण व्यवस्था आहे. कामावर संगणकचा वापर करणा-यांमध्ये स्वीडनचा जगात दुसरा क्रमांक लागतो. स्वीडनमधील ७५ टक्के लोक कामासाठी संगणकाचा वापर करतात. स्वीडनचा सरासरी बुध्यांक आहे १०१.