नवी दिल्ली : बेजबाबदारपणे वाहन चालवल्याने झालेल्या अपघातात मृताच्या वारसांना भरपाई देण्यास विमा कंपन्या बांधील नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे.
न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्या. आर. महादेवन यांच्या न्यायपीठाने हा निकाल दिला. १८ जून २०१४ रोजी एन. एस. रवीश या व्यक्तीचा कर्नाटकातील मल्लासांद्रा येथून कारने निघाल्यावर अपघातात मृत्यू झाला होता. अत्यंत वेगात असलेली ही कार नियंत्रण सुटल्यामुळे उलटली होती. यात रवीशचा मृत्यू झाला होता. याच कारमध्ये त्याचे वडील, बहीण व मुलेही होती.
उच्च न्यायालय म्हणाले होते, दावा करता येणार नाही
हा अपघात बेजबाबदारपणे कार चालवल्याने झाला. चालकाने वाहतूक नियमांचेही पालन केले नाही. या अपघातास चालकच जबाबदार होता. त्यामुळे त्याचे उत्तराधिकारी कोणत्याही भरपाईचा दावा करू शकत नाहीत. असा दावा मंजूर केला तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या चुकीच्या कार्यासाठीही भरपाई मिळू शकते, असा संदेश जाईल.
फेटाळला होता दावा
या अपघातानंतर विमा कंपनीने रवीश यांच्या कुटुंबीयांनी केलेला अपघात विम्याच्या भरपाईचा ८० लाख रुपयांचा दावा कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळला होता. न्यायालयाने हा निकाल देताना बेजबाबदारपणे कार चालवल्याने अपघात झाल्याचे निरीक्षण पुराव्याआधारे नोंदवले होते. या निकालात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानेही नकार दिला.