बडोद्यात सलग चौथ्यादिवशीही दंगल सुरुच
By Admin | Updated: September 28, 2014 18:37 IST2014-09-28T18:37:51+5:302014-09-28T18:37:51+5:30
गुजरातमधील बडोदा येथे सलग चौथ्या दिवशीही जातीय दंगल सुरुच असून दंगलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधूर व हवेत गोळीबार करावा लागला.
बडोद्यात सलग चौथ्यादिवशीही दंगल सुरुच
ऑनलाइन लोकमत
बडोदा, दि. २८ - गुजरातमधील बडोदा येथे सलग चौथ्या दिवशीही जातीय दंगल सुरुच असून दंगलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधूर व हवेत गोळीबार करावा लागला. शनिवारी रात्री दंगलखोरांच्या चाकूहल्ल्यात चार जण जखमीही झाले आहेत.
बडोदा येथे किरकोळ कारणावरुन दोन गटांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे दंगल सुरु आहे. नवरात्रौत्सव सुरु असतानाच बडोदा येथील दंगल अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. सलग चौथ्या दिवशी सुरु असलेल्या हिंसाचारात दंगलखोरांनी किमान ३० दुचाकी आणि ८ ते १० दुकानांमध्ये आग लावली. याशिवाय शहरातील विविध भागांमध्ये लुटमार व तोडफोडीच्या घटनाही घडत आहेत. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत आठ वेळा गोळीबारही करावा लागला. शनिवारी रात्री चाकूहल्ल्यात चार जण जखमी झाल्याचे वृत्त असून पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. रात्री साडे दहा ते दीडच्या सुमारास फत्तेहपुरा, चंपानेर, वाडी रंगमहाल, बावामनपूर, पानीगेट, शास्त्रीबाग अशा विविध भागांमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या. सोशल नेटवर्किंग साईट्सवरील आक्षेपार्ह छायाचित्र व बाईकचा किरकोळ अपघात यावरुन बडोद्यात दंगल सुरु झाल्याचे वृत्त आहे.
गुजरातमधील सांस्कृतिक राजधावी असलेल्या बडोद्यात अफवांवर लगाम लावण्यासाठी मोबाईलवरील इंटरनेट सुविधा व एसएमएस सुविधा बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी शांतता बाळगावी तसेच अफवेवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शहरात बीएसएफ, क्वीक रिस्पॉन्स टीम, राज्य राखीव दलाचे जवान यांचे पथक तैनात करण्यात आले असून पोलिसांनी काही दंगलखोरांना चौकशीसाठी ताब्यातही घेतले आहे.