काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचे म्हटलेच नव्हते - व्ही. के. सिंह
By Admin | Updated: November 16, 2014 13:47 IST2014-11-16T13:43:38+5:302014-11-16T13:47:38+5:30
लोकसभा निवडणुकीत जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आश्वासन देणा-या भाजपाने आता घुमजाव केले आहे.

काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचे म्हटलेच नव्हते - व्ही. के. सिंह
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - लोकसभा निवडणुकीत जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आश्वासन देणा-या भाजपाने आता घुमजाव केले आहे. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणा-या कलम ३७० वर पुनर्विचार करत असून हे कलम रद्द करण्याचे आम्ही कधीच म्हटले नव्हते असे विधान मोदी सरकारमधील विदेश राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी केले आहे.
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करावे यासाठी भाजपाने नेहमीच आग्रह धरला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातही कलम ३७० रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. चार दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनीदेखील कलम ३७० संदर्भात भाजपाचा जुना पवित्रा आजही कायम असल्याचे म्हटले होते. मात्र आता विदेश राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी हे कलम रद्द करण्याचे भाजपाने कधीच म्हटले नव्हते असे विधान केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे कलम ३७० वरुनही भाजपा यू टर्न घेत असल्याचे दिसत आहे.
जम्मू काश्मीरमध्ये आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून या पार्श्वभूमीवर कलम ३७० रद्द करण्याची भूमिका मांडणे भाजपाला महागात पाडू शकते. त्यामुळेच भाजपाने यू टर्न घेतले असावे अशी चर्चा रंगली आहे.