उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे भाजपाचे आमदार डॉ. जी. एस. धर्मेश आणि माजी मंत्री रामबाबू हरित यांच्यात एका अंत्ययात्रेमध्येच वाद होऊन धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान पोलिस आणि इथे उपस्थित असलेल्या अन्य लोकांनी मध्ये पडत दोन्ही नेत्यांना शांत केलं आणि प्रकरण निवळलं. दोन्ही नेत्यांमध्ये झालेला वाद आणि धक्काबुक्कीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आमदार जी. एस. धर्मेश आणि माजी मंत्री रामबाबू हरित हे चिरंजीलाल कुशवाहा यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. वातावरण गंभीर होतं. लोक शोकाकुल होते. त्याच दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये वादावादी होऊन प्रकरण धक्काबुक्की झाली. हा प्रकार अंत्ययात्रेदरम्यान घडल्याने लोकांकडून नेत्यांच्या असंवेदनशीलतेबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
चिरंजीलाल कुशवाहा यांचं काल निधन झालं होतं. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. अंत्ययात्रेला सुरुवात झाल्यावर काही महिला अंत्ययात्रेसमोरील रस्ता पदराने स्वच्छ करत होत्या. त्यात दरम्यान, फोटो काढण्यावरून बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यावसान धक्काबुक्कीत झालं.