गिरिराजांविरुद्ध देशभरात रान उठले

By Admin | Updated: April 3, 2015 07:44 IST2015-04-03T02:46:57+5:302015-04-03T07:44:43+5:30

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविषयी वर्णद्वेषी मुक्ताफळे उधळणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांच्याविरोधात देशभरात रान उठले आहे.

There is a ruckus against the Giriraj nation | गिरिराजांविरुद्ध देशभरात रान उठले

गिरिराजांविरुद्ध देशभरात रान उठले

नवी दिल्ली/बेंगळुरू : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविषयी वर्णद्वेषी मुक्ताफळे उधळणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांच्याविरोधात देशभरात रान उठले आहे. गिरिराज यांच्या बडतर्फीची मागणी करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी नवी दिल्लीपासून बेंगळुरूपर्यंत ठिकठिकाणी तीव्र निदर्शने केली. दिल्लीत संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच गिरिराज यांनी खेद व्यक्त केल्याने हा विषय
संपला असल्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. परंतु गिरिराज यांच्या वर्णद्वेषी मुक्ताफळांवर भाजपाच्याच गोटातून उमटू लागलेला नाराजीचा सूर सूचक आहे. शिवाय बिहारमधील न्यायालयाने गुन्हा (एफआयआर) नोंदविण्याचा आदेश पोलिसांना दिल्याने गिरिराज सिंग यांच्या अडचणीत भर पडली आहे.
बेंगळुरूत शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या तोंडावर गिरिराज यांच्या मुक्ताफळांपायी भाजपाला तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. स्वत: गिरिराज बुधवारीच बेंगळुरूला रवाना झाले. तरीही त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली; तर दिल्ली प्रदेश महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अशोक मार्गावरील भाजपा मुख्यालयाबाहेर  आंदोलन केले. ठिकठिकाणची निदर्शने पांगविताना पोलिसांनी कार्यकर्त्यांचे बॅनर्स हिसकावून घेतले. काही ठिकाणी लाठीहल्लाही केला. गिरिराज यांच्या प्रतीकात्मक पुतळ््याचे दहन करू पाहणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. श्रीनगर तसेच जयपूरमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. राजस्थान काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी गिरिराज यांच्याप्रमाणेच गोव्याचे मुख्यमंत्री पार्सेकर यांच्याही महिलाविरोधी वक्तव्याची निंदा केली.
दरम्यान, गिरिराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा केंद्रीय राज्यमंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनीही निषेध केला आहे. ‘एका केंद्रीय मंत्र्याने अशा भाषेत बोलणे उचित नाही. त्यांचे वक्तव्य निश्चितत आक्षेपार्ह आहे’, असे कुशवाह म्हणाले. गिरिराज यांनी राजीनामा द्यायला पाहिजे काय, असे विचारले असता कुशवाह म्हणाले, मी या मुद्यावर भाष्य करण्यास सक्षम नाही. भाजपाचे केंद्रीय नेतृत्व याबाबत निर्णय घेईल.

Web Title: There is a ruckus against the Giriraj nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.