गोवा भाजपासमोर आता धर्मसंकट

By Admin | Updated: November 8, 2014 03:50 IST2014-11-08T03:50:32+5:302014-11-08T03:50:32+5:30

गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली काही आमदारांनी घेतलेली बंडाची भूमिका

There is now a discord against Goa BJP | गोवा भाजपासमोर आता धर्मसंकट

गोवा भाजपासमोर आता धर्मसंकट

पणजी : गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली काही आमदारांनी घेतलेली बंडाची भूमिका आणि दुसऱ्या बाजूने मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासाठी जोरात सुरू असलेले लॉबिंग यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत तिढा निर्माण झाला आहे.
डिसोझा यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला असून हे पद देत नसाल, तर आपण सरकारमध्येही राहणार नाही, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे केंद्रीय निरीक्षक राजीव प्रताप रुडी यांनी गोव्यात धाव घेतली आहे.
डिसोझा हे लंडन दौरा अर्धवट सोडून शुक्रवारी दुपारी गोव्यात दाखल झाले. त्यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशीही ते बोलले. मी उपमुख्यमंत्रिपदी असल्याने नैसर्गिकपणे मीच मुख्यमंत्रिपदाचा दावेदार ठरतो. मी ज्येष्ठ असून दहा भाजपा आमदारांचा मला पाठिंबा आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपद मला मिळायला हवे. ते मिळत नसेल, तर मी कोणतेच मंत्रिपद स्वीकारणार नाही, असे डिसोझा यांनी जाहीर करून मुख्यमंत्री पर्रीकर व भाजपासमोर मोठा पेच निर्माण केला आहे.
भाजपाचे आमदार मायकल लोबो, किरण कांदोळकर, विष्णू वाघ, ग्लेन टिकलो, कार्लुस आल्मेदा, राजन नाईक आदींनी मिळून एक गट केला असून हे आमदार डिसोझा यांना जाऊन भेटले. आमचा पाठिंबा तुम्हाला असल्याचे या सर्वांनी डिसोझा यांना सांगितले. डिसोझा यांनीही आक्रमक भूमिका घेत आपण आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तीच्या हाताखाली काम करू शकत नाही, असे जाहीर केले. आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळत नसेल, तर आपण कोणतेच पद न स्वीकारता बाहेर राहिलेले बरे, असे डिसोझा म्हणाले. (खास प्रतिनिधी)

Web Title: There is now a discord against Goa BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.