शेतक-याच्या जीवापेक्षा काहीच मोठे नाही - नरेंद्र मोदी
By Admin | Updated: April 23, 2015 15:25 IST2015-04-23T14:25:03+5:302015-04-23T15:25:47+5:30
शेतक-यांच्या जीवनापेक्षा काही मोठे नाही, असे सांगत शेतक-यांच्या आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी सर्व सदस्यांनी दिलेल्या सूचना ऐकण्यासा आपण तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले.

शेतक-याच्या जीवापेक्षा काहीच मोठे नाही - नरेंद्र मोदी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - शेतक-यांच्या जीवनापेक्षा काही मोठे नाही, असे सांगत शेतक-यांच्या आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी सर्व सदस्यांनी दिलेल्या सूचना ऐकण्यासा आपण तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. दिल्लीत काल घडलेल्या
घटनेमुळे आपण अतिशय दु:खी झालो असेही ते म्हणाले.
दिल्लीत किसान रॅलीदरम्यान सर्वांदेखत झाडाला गळफास लावून आत्महत्या करणा-या गजेंद्र सिंग या शेतक-याच्या मृत्यमुळे संपूर्ण देश हादरला. त्याच पार्श्वभूमीवर लोकसभेत या वि,यावर चर्चा करण्यात आली. या मुद्यावर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी निवेदन दिल्यावर पंतप्रधानांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतक-यांच्याा आत्महत्या ही खूप जुनी व व्यापक समस्या असून देशासाठी तो चिंतेचा विषय आहे. प्रत्येक सरकारने त्यांच्या काळात ही समस्या सोडवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. भूतकाळात आपले प्रयत्न कुठे कमी पडले हे तपासून पाहण्याची गरज असून या समस्येवर योग्य उपाययोजना शोधण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
विरोधकांचा संसदेत गोंधळ
गजेंद्र सिंगच्या आत्महत्येप्रकरणी गृहमंत्री व पंतप्रधानांनी निवेदन द्यावे अशी मागणी करत विरोधकांनी संसदेत गदारोळ माजवल्यामुळे संसदेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. गजेंद्र जेव्हा आत्महत्या करत होता तेव्हा पोलिस काय करत होते, त्यांनी त्याला रोखण्यासाठी काहीच प्रयत्न का केले नाही असा सवाल काँग्रेसचे गट नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. गजेंद्रच्या मृत्यूला पोलिस जबाबदार असून याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली.
शेतकरी आत्महत्येवरून राजकारण नको - राजनाथ सिंग
कालची घटना अतिशय गंभीर व दुर्दैवी असून कोणत्याही पक्षाने या मुद्यावरून राजकारण करू नये असे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले. गजेंद्र सिंग आत्महत्या करण्यासाठी जेव्हा झाडावर चढला तेव्हा आजूबाजूचे लोक टाळ्या वाजवत त्याला उकसवत होते. मात्र पोलिसांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करत गजेंद्रला वाचवायचा प्रयत्न केला, मात्र अखेर ते अपयशी ठरले, असे सिंग म्हणाले. याप्रकरणी संसदमार्ग पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.