कार्यक्षमतेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही!
By Admin | Updated: September 15, 2014 04:08 IST2014-09-15T04:08:15+5:302014-09-15T04:08:15+5:30
रोज १८ तास काम करतो, त्यामुळे कोणी आपल्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. तीन महिन्यांचा काळ अत्यल्प असून मोठ्या अपेक्षा बाळगणे योग्य नव्हे

कार्यक्षमतेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही!
किशोर कुबल, पणजी
रोज १८ तास काम करतो, त्यामुळे कोणी आपल्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. तीन महिन्यांचा काळ अत्यल्प असून मोठ्या अपेक्षा बाळगणे योग्य नव्हे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. याआधीही आपण केंद्रात मंत्री होतो तेव्हा आठ तास काम करायचो, आता काम वाढले आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी कामगिरीचा अहवाल मागितल्याचे वृत्त मात्र त्यांनी फेटाळून लावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या १४ केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीबाबत अहवाल मागितला आहे त्यात श्रीपाद नाईक यांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. त्या अनुषंगाने त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रात याआधीही तुम्ही मंत्री होता, तेव्हाची कारकीर्द आणि आता, यात काय फरक वाटतो, असे विचारल्यावर ते की, निश्चितच पूर्वी इतके काम नव्हते अर्थात, काम करण्यासाठी कोणी दबाव आणत आहे अशातलाही भाग नाही. मी माझ्या अंत:करणाला स्मरून रोज किमान १८ तास देशाच्या जनतेसाठी देतो, कोणी सांगतो म्हणून नव्हे. तुमच्या कामगिरीवर मोदी असमाधानी असल्याचे वृत्त आहे हे खरे आहे का, असे विचारल्यावर त्यानी माझ्याकडे कोणताही अहवाल मागितला नाही. उलट आपण स्वत:हून तीन महिन्यांतील कामगिरीचा तपशील केंद्र सरकारला १00 दिवस पूर्ण झाले त्याच दिवशी पंतप्रधान कार्यालयाला पाठवला आहे. केलेल्या कामाची माहिती २५ सप्टेंबरपर्यंत पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यास सांगितले आहे. ते मी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाराणसीचा चेहरामोहरा बदलणारा मोठा प्रकल्प येत आहे, त्यासाठी पर्यटन खात्याचे महत्त्वाचे योगदान आहे. या प्रकल्पाचा रोड मॅप तयार आहे. एक -दोन महिन्यांत कामे मार्गी लागतील.
काश्मीर पूरग्रस्तांना खात्याच्या माध्यमातून १00 कोटी रुपये दिले. या काळात ८७ कोटींचे तीन मोठे प्रकल्पही गोव्यासाठी आणले. मुरगाव बंदरात ९ कोटींचे क्रुझ टर्मिनल येत आहे. वर्षभराचे काम तीन महिन्यांत कसे शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)