भूसंपादनावर पुन्हा अध्यादेश नाही - मोदींची महत्त्वपूर्ण घोषणा
By Admin | Updated: August 30, 2015 12:17 IST2015-08-30T12:17:40+5:302015-08-30T12:17:40+5:30
भूसंपादन विधेयकावरुन मोदी सरकारने माघार घेतली असून आता पुन्हा भूसंपादन विधेयकावर अध्यादेश काढणार नाही अशी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात कार्यक्रमात केली आहे.

भूसंपादनावर पुन्हा अध्यादेश नाही - मोदींची महत्त्वपूर्ण घोषणा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - भूसंपादन विधेयकावरुन मोदी सरकारने माघार घेतली असून आता पुन्हा भूसंपादन विधेयकावर अध्यादेश काढणार नाही अशी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात कार्यक्रमात केली आहे. मात्र विधेयकातील १३ महत्त्वाच्या मुद्द्यांची आजपासून अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बातमधून देशवासीयांशी संवाद साधला. यात त्यांनी भूसंपादन विधेयकावर माघार घेत असल्याचे सांगितले. प्रशासकीय कचाट्यातून बाहेर काढून शेतक-यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी आम्ही भूसंपादन विधेयकात सुधारणा केल्या होत्या. सुधारित भूसंपादन विधेयकाच्या अध्यादेशाची ३१ ऑगस्टला मुदत संपत आहे. आता आम्ही भूसंपादन विधेयकासाठी अध्यादेश काढणार नाही. यामुळे २०१३ मधील भूसंपादन विधेयक लागू होईल असेही त्यांनी सांगितले. विरोधकांनी आमच्या विधेयकावरुन शेतक-यांची दिशाभूल केली व त्यांच्या भीती निर्माण केली असे सांगत त्यांनी विरोधकांचाही समाचार घेतला.
गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला. मात्र आता गुजरातमध्ये जनतेने पुन्हा एकदा शांतीचा मार्ग स्वीकारला आहे. यासाठी मी त्यांचा आभारी आहे असे मोदींनी म्हटले आहे. देशातील प्रत्येक समस्येवर विकास हेच उत्तर आहे असेही त्यांनी सांगितले. अमेरिकेतील स्पर्धा जिंकणा-या महाजन बंधूंचही मोदींनी जाहीर कौतुक केले. इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारु असा पुनरुच्चार त्यांनी केला.