सोनियांच्या सभेला गर्दी;पण काँग्रेसमध्ये जोश नाही
By Admin | Updated: February 4, 2015 02:55 IST2015-02-04T02:55:54+5:302015-02-04T02:55:54+5:30
सोनिया गांधी यांच्या सभेला माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी हजेरी लावल्यामुळे काँग्रेसचे प्रचार व्यवस्थापक विशेषत: समितीचे अध्यक्ष अजय माकन यांना धक्का बसला आहे.

सोनियांच्या सभेला गर्दी;पण काँग्रेसमध्ये जोश नाही
नबीन सिन्हा - नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची दिल्लीतील बद्रापूर येथील सभा यशस्वी होऊनही पक्षात हवा तसा जोश आलेला नाही. सरचिटणीस पी. सी. चाको यांनी अन्य राज्यांमधील विविध नेत्यांची मदत घेण्याची योजना आखल्याचे पाहता काँग्रेसने हे आव्हान पेलण्यासाठी धडपड चालविल्याचे दिसते.
सोनिया गांधी यांच्या सभेला माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी हजेरी लावल्यामुळे काँग्रेसचे प्रचार व्यवस्थापक विशेषत: समितीचे अध्यक्ष अजय माकन यांना धक्का बसला आहे. काँग्रेसने आजवर शीला दीक्षित यांच्यापासून अंतर राखले होते. त्यांची प्रचाराची मदत घेण्याचा आदेशही देण्यात आला नव्हता. दीक्षित यांची मदत घेणे पक्षाला महागात पडू शकते, असे विधान माकन यांच्याशी जवळीक असलेल्या एका नेत्याने केले आहे.
नवी दिल्ली मतदारसंघात आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या काँग्रेसच्या उमेदवार किरण वालिया यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेस नेत्यांना धक्का बसला आहे. डिसेंबर २०१३ मध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या सभांना गर्दी नव्हती.
याउलट आता चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र अजूनही दिल्लीतील हवा काँग्रेसला अनुकूल बनलेली नाही. कार्यकर्त्यांमध्ये पूर्वीसारखा उत्साह नाही, असे एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले.
दुहेरी आकडा गाठण्याचे आव्हान
डिसेंबर २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पार वाताहत झाली. पक्षाला केवळ आठ जागा मिळाल्या. पक्षासमोर आता दुहेरी आकडा गाठण्याचे आव्हान आहे. हारुन युसूफ आणि माकन यासारखे नेते तिरंगी लढतीत अडकले आहेत. कोणत्याही मतदारसंघात काँग्रेससाठी विजय सोपा नाही. भाजपमध्ये घसरण झाली तरी त्याचा लाभ केवळ आम आदमीलाच होईल, असा दावा एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर केला.
काँग्रेसने केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग तसेच बिहार, उत्तर प्रदेश व प. बंगालमधील नेत्यांना विविध भागांत प्रचाराला लावले.
माजी खासदार आणि माजी मंत्र्यांचीही मदत घेण्याची योजना आहे. माजी खासदार जे. पी. अग्रवाल वगळता कपिल सिब्बल, संदीप दीक्षित यांच्यासारख्या नेत्यांनी स्वत:ला प्रचारापासून दूर ठेवले आहे.