पक्ष, सरकारमध्ये विसंगती नाही
By Admin | Updated: December 4, 2014 00:56 IST2014-12-04T00:56:28+5:302014-12-04T00:56:28+5:30
शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी पक्ष आणि सरकार यांंनी परस्पर विरोधी सूर लावले असतानाच, भाजपाने मात्र या मुद्यावर कुठलीही विसंगती नसल्याचे म्हटले आहे़

पक्ष, सरकारमध्ये विसंगती नाही
नवी दिल्ली : शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी पक्ष आणि सरकार यांंनी परस्पर विरोधी सूर लावले असतानाच, भाजपाने मात्र या मुद्यावर कुठलीही विसंगती नसल्याचे म्हटले आहे़
तीन तपास संस्था या घोटाळ्याचा तपास करीत आहे आणि सरकारने यासंदर्भात कुणालाही क्लीन चीट दिली नाही, असे भाजपाने यासंदर्भात स्पष्ट केले आहे़
भाजपाचे राष्ट्रीय सचिव सिद्धार्थनाथ सिंह यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना ही स्पष्टोक्ती दिली़ शारदा चिटफंड घोटाळ्यासंदर्भात सरकार आणि पक्षात परस्पर विरोधी मते असल्याचा दावा काही बातम्यांमधून केला जात आहे़ पण अशी कुठलीही विसंगती नसल्याचे मी स्पष्ट करू इच्छितो़ शारदा चिटफंड घोटाळ्याचा पैसा पश्चिम बंगालमध्ये अतिरेकी कारवायांमध्ये लावला गेला, हे जगजाहीर आह, असेही ते म्हणाले.
सीबीआय याचा तपास करीत आहे़ या माहितीच्या आधारेच भाजपाध्यक्षांनी काही आरोप केले होते आणि आज केंद्रीय मंत्री जितेन्द्र सिंह यांनी तपास संस्था याचा तपास करीत असल्याचे सांगितले़ सरकारने कुणालाही क्लीन चीट दिलेली नाही़ तपास होऊ द्या, प्रकरणातील सत्य काय ते समोर येईलच, असेही ते म्हणाले़
(लोकमत न्यूज नेटवर्क)