RBI Report per Capita Debt: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या रिपोर्टने खळबळ उडाली आहे. मागील दोन वर्षात प्रत्येक भारतीयावरील भांडवली कर्जात प्रचंड वाढ झाली असून, ते ९० हजारांने वाढून ४.८ लाखांच्या घरात गेले आहे. यावरूनच काँग्रेसने मोदी सरकारवर हल्ला चढवला. 'सगळे सरकारी प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा खासगी भागीदारीतून होत आहेत, तर मग देशावर हे कर्ज का वाढत चालले आहे? देशातील प्रत्येक नागरिकावर ४,८०,००० हजारांचे कर्ज का झाले आहे?, असा सवाल काँग्रेसने मोदी सरकारला केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी आरबीआयच्या अहवालातील आकडेवारीवर बोट ठेवत काही मुद्दे उपस्थित केले आहेत.
जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, "अच्छे दिनचे कर्ज. मोदी सरकारने मागील ११ वर्षाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. लोकांचे आयुष्य सुधारण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाही. फक्त उद्योगपती मित्रांसाठी धोरणे बनवली गेली. त्यातून झालेले नुकसान देशातील जनतेला सोसावे लागत आहेत. हे सत्य कुठल्या न कुठल्या प्रकारे दररोज आपल्यासमोर येत आहे."
मोदीराजमध्ये देशातील कर्जाचे ओझे वाढले
"रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल चिंता वाढवणारे चित्र समोर आले आहे. सरकारकडून आकड्यांचा खेळ आणि तज्ज्ञाची मदत घेऊन मूळ उणीवा लपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही की, देशावरील कर्जाचे ओझे मोदीराजमध्ये उच्चांकी पातळीवर गेले आहे", असे रमेश यांनी म्हटले आहे. रमेश यांनी रिपोर्टमधील काही मुद्देही मांडले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, "२ वर्षात प्रत्येक व्यक्तीवरील कर्ज ९० हजारांनी वाढून ४.८ लाख झाले आहे. हातात येणाऱ्या कमाईतील २५.७ टक्के पैसे फक्त कर्ज फेडण्यात चालले आहेत. सर्वात जास्त ५५ टक्के कर्ज कथित क्रेडिट कार्ड, मोबाईल ईएमआय याच्यासाठी जात आहे. याचा अर्थ महागाईमुळे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होत नाहीये आणि कर्ज घेण्याची नामुष्की त्यांच्यावर येत आहे", असे जयराम रमेश म्हणाले.
वाचा >>प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
"तरुणांना नोकऱ्या नाही. शेतकरी आत्महत्या करत आहे. जनता महागाईने त्रस्त आहे. संवैधानिक संस्थांना चिरडले जात आहे. जनता कर्जात बुडत चालली आहे आणि मोदीजींचे प्रिय मित्र नफा कमवत आहेत. त्यांची संपत्ती वाढतच चालली आहे", अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे.