...तर देशाची पुन्हा फाळणी होईल
By Admin | Updated: June 13, 2015 01:59 IST2015-06-13T01:59:18+5:302015-06-13T01:59:18+5:30
: हिंदूराष्ट्र निर्माण करण्याच्या संकल्पनेला बळ देणे म्हणजे भारताच्या आणखी एका फाळणीला खतपाणी घालण्यासारखे असल्याचे मत जेष्ठ

...तर देशाची पुन्हा फाळणी होईल
मडगाव (गोवा) : हिंदूराष्ट्र निर्माण करण्याच्या संकल्पनेला बळ देणे म्हणजे भारताच्या आणखी एका फाळणीला खतपाणी घालण्यासारखे असल्याचे मत जेष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांनी येथे बोलताना व्यक्त केले. ‘एका नास्तिकाचो देवारो’ या कोकणी पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
भारतातील काही लोक हिंदूराष्ट्र निर्मितीची भाषा करतात. भारत हे निधर्मी राष्ट्र आहे. भारतातील विचारवंतांनी जगाला वेगळ््या तत्वज्ञानाची ओळख करून दिली, या थोर राष्ट्रात धर्माच्या नावावर राष्ट्र निर्मितीची संकल्पना मांडणाऱ्यांना देशाची फाळणी करण्याची खुमखुमी लागली असल्याचा टोला मनोहर यांनी लगावला.
सत्ताधाऱ्यांनी स्वार्थासाठी पीडित, महिला, दलितांना देवाची भीती दाखवत त्यांच्या वैचारिकतेवर लगाम घातल्यामुळे लोक या बंधनातून मुक्त होत नाहीत. जो माणूस देवावर श्रद्धा ठेऊन स्वत:चे विचार गहाण ठेवतो, त्याच्या बुद्धीचा विकास होत नसल्याचे मनोहर म्हणाले.
जेव्हा माणसाला ईश्वराची कल्पना नव्हती तेव्हा त्यांच्यामध्ये विचार करण्याची शक्ती होती. माणूस स्वत:च्या जीवनाचा मार्ग स्वत:च शोधत होता. जेव्हा माणसाला ईश्वराची कल्पना जाणवली तेव्हा त्यांच्यात पराधिनतेची, परावलंबनाची शक्ती एकवटली व विचार करण्याची सवय नष्ट झाली. आपल्या सर्व दु:खांचा, समस्यांचा ठेका देवावर टाकून माणूस मोकळा झाला. तेच त्याच्या विनाशाचे प्रमुख कारण ठरल्याचे मनोहर म्हणाले.
लेखक दत्ता नायक स्वत: नास्तिक असून त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून वैचारिकतेची कास धरल्याचे त्यांनी सांगितले. दिवंगत माधवी सरदेसाई यांच्याकडून पुस्तकाची संकल्पना मिळाल्याचे नायक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)