रस्त्यावरून फिरणाऱ्या मोकाट वळूची कळ काढून त्याला डिवचणं एका तरुणाला चांगलंच महागात पडल्याची घटना मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे घडली आहे. येथे रस्त्यावर फिरणाऱ्या वळूला वारंवार डिवचणाऱ्या तरुणाला चवताळलेल्या वळूने शिंगांनी हल्ला करून खाली आपटले. यात या तरुणाचा जागेवरच जीव गेला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार जबलपूर कँट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गॅरिसन ग्राऊंड येथे फिरत असलेल्या एका मोकाट वळूचा आजूबाजूने एक तरुण बराच वेळ फिरत होता. तसेच त्याच्या जवळ जाऊन त्या वळूला डिवचत होता. त्यामुळे चवताळलेल्या वळूने या तरुणाला थेट शिंगावर घेत जमिनीवर आपटले. वळूने केलेल्या हल्ल्यामुळे जबर जखमी झालेल्या या तरुणाने जागेवरच प्राण सोडले.
गॅरिसन ग्राऊंडवर फिरत असलेल्या एका वळूने या तरुणाला शिंगावर घेऊन उचलून आपटतानाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वळूने हल्ला करण्यापूर्वी सदर तरुण हा त्याच्या जवळ जाऊन त्याला वारंवार डिवचताना दिसत आहे. त्यानंतर वळू त्याला उचलून आपटताना दिसत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ही घटना ज्यावेळी घडली, त्यावेळी गॅरिसन ग्राऊंडमध्ये इतर अनेल जण उपस्थित होते. मात्र कुणीही या तरुणाची समजूत घालून त्याला बाजूला करताना दिसले नाहीत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. हा तरुण कोण होता आणि तो तिथे का आला होता, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.