अमेरिकेने गिळला एक रुपया, डॉलरच्या तुलनेत ९९ पैशांनी घसरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 06:31 AM2022-09-23T06:31:53+5:302022-09-23T06:33:04+5:30
डॉलरच्या तुलनेत ९९ पैशांनी घसरण; वस्तूंच्या किमती वाढणार
नवी दिल्ली : भारतीय रुपयामध्ये मोठी घसरण गुरुवारी पाहायला मिळाली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल ९९ पैशांनी कोसळून आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी म्हणजे ८०.९५ रुपये या पातळीवर आला आहे. बुधवारीही रुपयात २६ पैशांची घसरण झाली होती. रुपया कोसळल्यामुळे आयात महागणार असून, वस्तूंच्या किमतीत आणखी वाढ होणार आहे.
रुपयाची किंमत का घसरली?
अमेरिकेची केंद्रीय बँक ४० वर्षांच्या उच्चांकी महागाई आणि मंदीच्या भीतीने त्रस्त आहे. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी फेडने व्याजदरात सलग तिसऱ्यांदा ०.७५ टक्क्यांनी वाढ केली. त्यामुळे व्याजदर वाढून ३ ते ३.२५ टक्क्यांवर पाेहोचले. त्याचा परिणाम म्हणून रुपयासह जगभरातील इतर
देशांच्या चलनात घसरण झाली.
अमेरिकेत व्याजदर वाढला की तेथील चलन म्हणजेच डॉलरची किंमत वाढते. डॉलर भक्कम होतो. तर दुसरीकडे रुपयासारख्या इतर चलनांची किंमत कमी होते. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढल्यानंतरही रुपया
कमकुवत होतो.
शेअर बाजार ३३७ अंकांनी कोसळला
भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. यामुळे निर्देशांक ३३७ अंकांनी कोसळून बंद झाला. अमेरिकन रिझर्व्हकडून व्याजदरात कठोरपणे वाढ आणि जागतिक स्तरावर कमकुवत झालेली स्थिती याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. आशियासह अन्य बाजारांमध्येही गुरुवारी घसरण दिसून आली. विदेशी गुंतवणूकदारांनी बुधवारी ४६१.०४ कोटी रुपये बाजारातून काढून घेतले आहेत. याच वेळी कच्चे तेल ९०.८२ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले आहे.
अमेरिकेत व्याजदर २००८च्या स्तरावर पोहोचलेत. यामुळे मंदी येऊ शकते की नाही हे कोणालाच माहिती नाही, परंतु असे झाले तर ती किती गंभीर असेल?. आपल्याला महागाईवर मात करायची आहे. असे करण्यासाठी वेदना देण्याशिवाय दुसरा पर्याय असता तर किती बरे झाले असते. मात्र असा काही पर्याय दिसत नाही, असे फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी म्हटले आहे.
क्रिप्टोबाजारात हाहाकार
सोने चांदीचे दर सपाट पातळीवर असून, क्रिप्टोबाजारात हाहाकार उडाला आहे. इथेरियम तब्बल ८ टक्क्यांनी कोसळला असून, बिटकॉईनही १८हजार डॉलरच्या जवळ आला आहे.
महागाईमुळे काय होते?
विकासदर मंदावतो. बेरोजगारी वाढते. मंदीची भीती आणखी वाढते.
भारताला फायदा की नुकसान
निर्यातीसाठी फायदा होईल, कारण पेमेंट डॉलरमध्ये होईल.
याचा आयटी आणि औषध कंपन्यांना फायदा होईल.
जगभरात काय घडतेय?
स्वित्झर्लंड : मध्यवर्ती बँकेने गुरुवारी व्याजदरात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ केली. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी बँकेने ही पावले उचलली आहेत. बँकेने व्याजदर वाढून ०.५ टक्के केला आहे, जो आतापर्यंत उणे ०.२५ टक्के होता.
जपान : येन चलनाची घसरण रोखण्यासाठी मध्यवर्ती बँकेने बाजारात हस्तक्षेप करण्याचे मोठे पाऊल उचलले. येन २४ वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे.
ब्रिटन : ब्रिटनच्या सेंट्रल बँकेनेही महागाई टाळण्यासाठी व्याजदरात पुन्हा एकदा ०.५० टक्क्यांनी वाढ केली आहे. ही व्याजदरातील २७ वर्षांतील सर्वात मोठी वाढ आहे. राणीच्या निधनामुळे हा निर्णय घेण्यास एक आठवडा उशीर झाला.
तुर्की : देशातील महागाई ८० टक्क्यांच्या वर पोहोचूनही तुर्कीच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात १०० बेसिस पॉइंटने कपात करत बाजारांना आश्चर्यचकित केले. येथे रेपो दर १३ वरून १२ टक्के करण्यात आला आहे.