HM Amit Shah On Pahalgam Attack: पहलगाममध्ये २६ निष्पाप नागरिकांची हत्या करणाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सज्जड दम दिला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शाह यांनी सार्वजनिक व्यासपीठावार याबाबत भाष्य केले आहे. अमित शाह यांनी पहलगाम हल्ल्यावर पहिल्यांदाच बोलताना सूड घेण्याची शपथ घेतली आहे. हे नरेंद्र मोदी सरकार आहे त्यामुळे कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी दिला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना तुम्ही युद्ध जिंकले आहेअसे समजू नका असा इशारा दिला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्या पहिल्यांदाच अमित शाह बोलत होते. दहशतवाद्यांनी असे समजू नये की त्यांनी २६ लोकांना मारल्यानंतर युद्ध जिंकले आहे, लढाई अजून बाकी आहे, असं अमित शाह म्हणाले. बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी उभारण्यात आलेल्या रस्त्याच्या आणि पुतळ्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
"दहशतवादाला आम्ही सडेतोडपणे उत्तर दिलं आहे. जर कोणी भ्याड हल्ला करून हा आपला मोठा विजय आहे असे समजत असेल, तर एक गोष्ट समजून घ्या, हे नरेंद्र मोदी सरकार आहे, कोणालाही सोडले जाणार नाही. देशाच्या प्रत्येक इंच जमिनीवरून दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो पूर्ण होणारच. या लढाईत केवळ १४० कोटी भारतीयच नाही तर संपूर्ण जग भारतासोबत उभं आहे. जगातील सर्व देश एकत्र आले आहेत आणि दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत भारतीय जनतेसोबत उभे आहेत. मी पुन्हा एकदा हा सांगू इच्छितो की जोपर्यंत दहशतवादाचा समूळ नाश होत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील आणि ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना योग्य ती शिक्षा नक्कीच दिली जाणार आहे," असं अमित शाह म्हणाले.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २५ पर्यटकांसह एका स्थानिकाचा मृत्यू झाला होता. गेल्या काही वर्षातील पहलगामची घटना हा सर्वात मोठा हल्ला होता.