अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाला आज पंधरा दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धामुळे आखातामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच आखातामधील तणावामुळे भारतात अभूतपूर्व अशी गॅस टंचाई निर्माण झाली आहे. त्यात केंद्र सरकारने व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद केल्याने आणि गॅसटंचाईच्या संकटाच्या भीतीने घरगुती गॅस ग्राहकांनी गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींसमोर सिलेंडरसाठी रांगा लावल्याने परिस्थिती अधिकच बिघडल्याचं चित्र निर्माण झालं होतं. दरम्यान, आज केंद्र सरकारने व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पुन्हा सुरू केला आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. व्यावसायिक सिलेंडरबाबत खूप चर्चा झाली आहे. त्यानंतर व्यावसायिक ग्राहकांना काही एलपीजी देण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच याबाबत राज्य सरकारशीही चर्चा झाली आहे. दरम्यान, देशाकडे गॅसचा पुरेसा साठा आहे. तसेच गॅसची कुठलीही टंचाई नाही आहे. असं असलं तरी लोक मोठ्या प्रमाणावर पॅनिक बुकिंग करत आहेत. त्यामुळे लोकांनी पॅनिक बुकिंग करू नये, असं आवाहनही सुजाता शर्मा यांनी केलं.
दरम्यान, सुजाता शर्मा यांनी सांगितले की, आता क्रूड ऑईल आणि रिफायनरीच्या प्रश्नाबाबत बोलायचं तर देशाकडे क्रूड तेलाचा पुरेसा पुरवठा होत आहे. देशात पुरेसं पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध आहे. आम्ही आमच्या गरजेच्या हिशेबाने पुरेसं पेट्रोल आणि डिझेल उत्पादन करत आहोत. तसेच आम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठण्याची आवश्यकता नाही आहे, असेही सुजाता शर्मा यांनी सांगितले.
एवढंच नाही तर व्यावसायिक सिलेंडरच्या एलपीजी ग्राहकांना पीएनजीच्या दिशेने वळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पीएनजीचं कनेक्शन जेवढ्या लवकर हवं असेल तेवढ्या लवकर दिलं जाईल. एलपीजीचं सध्या पॅनिक बुकिंग मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे जेव्हा आवश्यकता असेल तेव्हाच बुकिंग करावं, असं आवाहन सरकारने केलं आहे.