अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात काल अलास्का मध्ये बैठक झाली. या बैठकीकडे जगाचे लक्ष लागले होते. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी ही बैठक होती. या बैठकीनंतर आता भारतानेही प्रतिक्रिया दिली आहे.
"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील अलास्कामध्ये झालेल्या शिखर बैठकीचे भारत स्वागत करतो. शांततेसाठी त्यांचे नेतृत्व अत्यंत कौतुकास्पद आहे', असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.
संवाद आणि राजनैतिक कूटनीति हाच एकमेव मार्ग
"भारत शिखर परिषदेत झालेल्या प्रगतीचे कौतुक करतो. संवाद आणि राजनैतिक कूटनीति हाच एकमेव मार्ग आहे. जगाला युक्रेनमधील संघर्षाचा लवकर अंत पाहायचा आहे", असंही णधीर जयस्वाल म्हणाले.
भारतासाठी दिलासादायक बातमी
ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीनंतर भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ते रशिया आणि त्यांच्या व्यापारी भागीदारांवर तात्काळ अतिरिक्त निर्बंध लादण्याचा विचार करत नाहीत. ट्रम्प यांनी यावर जोर दिला की त्यांना २-३ आठवड्यांत त्यावर पुनर्विचार करावा लागू शकतो.
ट्रम्प यांनी युक्रेन युद्धावर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर रशियाबद्दलची आपली भूमिका सॉफ्ट केली आहे.त्यांनी म्हटले आहे की, अलास्का शिखर परिषद चांगली होती आणि त्यांनी त्याला १० पैकी १० रेटिंग दिले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी रशियाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती. "मला दोन किंवा तीन आठवड्यात निर्बंधांबद्दल विचार करावा लागू शकतो, परंतु आपल्याला लगेच त्याबद्दल विचार करण्याची गरज नाही', असंही ट्रम्प यांनी म्हटले आहे.