आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : विरोधी पक्षांची आघाडी इंडियाने भाजपविरोधी विचारसरणींच्या पक्षांसाठी आपले दरवाजे उघडले आहेत. मात्र, हरयाणात सोमवारी माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात काँग्रेसच्या एकाही नेत्याने सहभाग घेतला नाही.
इंडियन नॅशनल लोक दलाचे नेते अभय सिंह चौटाला यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना या रॅलीसाठी आमंत्रित केले होते. यानंतर हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी याला विरोध केला आणि सांगितले की, हरयाणात काँग्रेस एकटीच सक्षम आहे. आम्हाला कोणासोबत तडजोडीची गरज नाही. हरयाणातील कैथलमध्ये मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, जेडीयूचे के. सी. त्यागी, टीएमसीचे राज्यसभा सदस्य डेरेक ओब्रायन, भाजपचे चौधरी बीरेंद्र सिंह, चंद्रशेखर रावण यांची उपस्थिती होती. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा हे इंडियन नॅशनल लोक दलासोबत आघाडी करण्यास इच्छुक नाहीत. आर. के. आनंद यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली होती, तेव्हाही काँग्रेसने इंडियन नॅशनल लोक दलाला पाठिंबा देण्यास नकार दिला होता.