काँग्रेसमधील परिवर्तनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज; चिंतन शिबिरात सोनिया गांधींचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 06:15 AM2022-05-14T06:15:09+5:302022-05-14T06:15:25+5:30

पक्षात मोठ्या बदलांचे संकेत

The need for collective efforts for change in Congress; Sonia Gandhi's statement in Chintan Shivir | काँग्रेसमधील परिवर्तनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज; चिंतन शिबिरात सोनिया गांधींचे प्रतिपादन

काँग्रेसमधील परिवर्तनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज; चिंतन शिबिरात सोनिया गांधींचे प्रतिपादन

Next

- आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क
उदयपूर : काँग्रेसमध्ये मोठे बदल करणे आवश्यक आहे. सामूहिक प्रयत्नांतूनच पक्षात परिवर्तन होऊ शकते. काँग्रेसने आजवर प्रत्येक नेता, कार्यकर्त्याला अनेक गोष्टी दिल्या आहेत. आता त्यांनी पक्षाचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येथे स्पष्ट केले. शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. 

चिंतन शिबिराला सुमारे ४५० काँग्रेस नेते उपस्थित आहेत. सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, काँग्रेस नेत्यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून पक्षाच्या हिताला प्राधान्य द्यावे. पक्ष मजबूत होण्याकडे प्रत्येक नेत्याने लक्ष द्यावे. चिंतन शिबिरात काँग्रेसमधील नेत्यांनी मनमोकळेपणाने विचार मांडावेत. मात्र, पक्षातील नेत्यांत अभेद्य एकजूट आहे, असा संदेश चिंतन शिबिरातून जायला हवा.

काँग्रेस करतेय आत्मपरीक्षण : काँग्रेसने आत्मपरीक्षणास सुरुवात केली आहे. आपला पक्ष अधिक मजबूत करण्याची संधी चिंतन शिबिराच्या निमित्ताने प्राप्त झाली आहे. त्याचा पुरेपूर उपयोग प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता, नेत्यांनी करून घ्यायला पाहिजे.     - सोनिया गांधी.

सोनिया गांधी म्हणाल्या...
n काँग्रेसला आलेल्या अपयशाची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आगामी काळात पक्षाला कशा प्रकारे संघर्ष करावा लागणार आहे याचीही आम्हाला जाण आहे. 
n राजकारणात काँग्रेसला पूर्वी जे स्थान होते, तेच पुन्हा मिळवून देण्याचा निर्धार पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी करायचा आहे. 
n पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीत देशात मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होत आहे. तसेच अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असून विरोधकांना धमकाविले जात आहे. 

राहुल गांधी यांचा रेल्वेने प्रवास
शिबिराला उपस्थित राहण्यासाठी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीहून चेतक एक्स्प्रेसने उदयपूरपर्यंतचा प्रवास केला. प्रवासात त्यांचे हरयाणा व राजस्थानातील विविध स्थानकांवर जंगी स्वागत झाले. 

 नेत्यांच्या छायाचित्रांचे फलक
शिबीरस्थळी व शहरामध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षांबरोबरच माजी पंतप्रधान नरसिंहराव, मनमोहन सिंग यांची छायाचित्रे असलेले अनेक फलक उभारल्याचे दिसून आले. 

Web Title: The need for collective efforts for change in Congress; Sonia Gandhi's statement in Chintan Shivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.