आजकाल रील्स बनवण्याची क्रेझ एवढी प्रचंड वाढली आहे की, लोक जीवाचीही परवा करत नाहीत. एक अशीच दुःखद घटना उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातून समोर आली आहे. येथे एक महिला रील बनवताना गंगा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना उत्तरकाशीतील मणिकर्णिका घाटावर घडली. येथे मुळची नेपाळ मधील रहिवासी असलेली महिला व्हिडिओ बनवत होती.
यासंदर्भात बोलताना, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, संबंधित महिला, रील बनवण्यासाठी नदीच्या अकदी जवळ एक धोकादायक ठीकाणी उभी होती. कॅमेरा सुरू झाल्यानंतर, तिचा तोल गेला आणि ती पाय घसरून नदीतपात्रात कोसळी आणि बुडली.
जवळपासच्या लोकांना काही समजण्याच्या आतच..., बचाव कार्य सुरू -संबंधित महिला पाण्यात कोसळल्यानंतर, व्हिडिओ बनवणाऱ्या तिच्या मुलाने अथवा मुलीने मम्मी... मम्मी... असा आवाजही दिला. मात्र, जवळपासच्या लोकांना काही समजण्याच्या आतच, ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. यानंतर, तत्काळ संबंधित प्रशासनाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच एसडीआरएफ आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्याला सुरुवात झाली. मात्र, अद्यापही महिला सापडल्याची माहिती नाही.
नद्या, पर्वत आणि अशी नैसर्गिक ठिकाणे जेवढी सुंदर, तेवढीच धोकादायकही -या घटनेसंदर्भात बोलताना, उत्तरकाशी प्रशासनाने म्हटले आहे की, लोकांनी रील अथवा सोशल मीडियासाठी अशा प्रकारचे धोकादायक स्टंट करू नयेत. नद्या, पर्वत आणि अशी नैसर्गिक ठिकाणे जेवढी सुंदर असतात, तेवढीच ती धोकादायकही असतात. यामुळे एखादी छोटी चूकही घातक ठरू शकते.