केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या देशात अस्थिरता निर्माण होण्यासंदर्भातील विधानावरून जोरदार पलटवार केला आहे. ते मंगलवारी म्हणाले, भारतीय संविधान हे कुणाच्या वडिलांचे संविधान नाही. असदुद्दीन ओवैसी यांनी गैरसमजात राहू नये. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही, मग तो हिंदू असो अथवा मुस्लीम. संविधान जे सांगेल तसेच वक्फ बोर्डात होईल.
गिरिराज सिंह म्हणाले, सोशल इक्वलिटीसंदर्भात (सामाजिक समानता) काँग्रेसला विचारा. सोशल इक्वलिटी कायदा आहे. ते घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. देश भीतीने नाही, तर कायद्याने चालतो. गिरिराज सिंह एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी लोकसभेतील विरोधीपक्ष नेते तथा राहुल गांधी यांनाही निशाण्यावर घेतले. त्यांची (राहुल गांधी) मानसिकता भारत विरोधी आहे. ते तर चीनकडून पैसा खातात, असे सिंह यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी ? - वक्फ कायद्यातील दुरुस्तीसंदर्भात सभागृहात बोलताना एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारला थेट इशारा दिला होता. ते म्हणाले होते, "जर केंद्र सरकारने वक्फ कायदा आणला, तर संविधानाच्या कलम २५, २६ आणि १४ चे घोर उल्लंघन होईल आणि यामुळे देशात सामाजिक अस्थिरता निर्माण होईल. संपूर्ण मुस्लीम समुदायाने या कायद्याला विरोध केला आहे. जर हे विधेयक मंजूर झाले तर वक्फची कोणतीही मालमत्ता शिल्लक राहणार नाही."
"मी माझ्या मशिदीचा एक इंच भागही जाऊ देणार नाही" : असदुद्दीन ओवेसी -वक्फ मालमत्तेसंदर्भात बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते, “एक अभिमानी भारतीय मुस्लीम असल्याने, मी माझ्या मशिदीचा एक इंच भागही जाऊ देणार नाही, माझ्या दर्ग्याचा एक इंच भागही जाऊ देणार नाही. ही मालमत्ता आमची आहे, ती आम्हाला कुणाकडून मिळालेली नाही आणि ती आमच्यापासून कुणी हिरावूनही घेऊ शकत नाही, कारण वक्फ आपल्यासाठी पूजेच्या स्वरूपात आहे.”