Leh Violence: लडाख या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी बुधवारी लेहमध्ये हिंसक निदर्शने झाली. या आंदोलनादरम्यान, विद्यार्थ्यांची पोलीस आणि सुरक्षा दलांशी जोरदार चकमक झाली. या चकमकीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. आता या आंदोलनावर सरकारने भूमिका मांडली आहे. आज लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांना जबाबदार धरले आहे.
केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाने सगळ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. लेहमध्ये आंदोलक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमधील संघर्षात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी बाधित भागात कर्फ्यू जाहीर केला आहे. दुसरीकडे, केंद्रीय गृह मंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणावर एक निवेदन जारी करत सोनम वांगचुक यांना आंदोलनासाठी दोषी ठरवले. मंत्रालयाने निवेदनात सोनम वांगचुक यांनी १० सप्टेंबर २०२५ रोजी सहावी अनुसूची आणि लडाखला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी उपोषण सुरू केले होते.
हिंसाचाराबद्दलच्या सरकारी निवेदनात आंदोलक सोनम वांगचुक यांना लक्ष्य करण्यात आले आहे. वांगचुक यांच्या प्रक्षोभक विधानांमुळे लेहमध्ये जमावाने हिंसाचार केला गेला असं सरकराने म्हटलं. दरम्यान, लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीच्या विस्तारासाठी निदर्शने करणाऱ्या सोनम वांगचुक यांनी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांचे १५ दिवसांचे उपोषण मागे घेतले आहे. त्यांनी या आंदोलनाचे वर्णन "जेन-झेड क्रांती" असे केले आहे.
दरम्यान, भारत सरकार लेह आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स, ही सर्वोच्च संस्था आहे, यांच्याशी सक्रियपणे संवाद साधत आहे. उच्चाधिकार समिती आणि उपसमितीद्वारे आणि नेत्यांसोबत अनेक अनौपचारिक बैठका घेऊन त्यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या आहेत असे गृहमंत्रालयाने निवेदनात म्हटलं.
मंगळवारी रात्री आंदोलकांनी २४ सप्टेंबर रोजी लडाख बंदची हाक दिली होती. लेह हिल कौन्सिलमध्ये येण्यासाठी लोकांना आवाहन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला. याचा परिणाम झाला आणि मोठ्या संख्येने लोक आले. आंदोलकांना रोखण्यासाठी लेह हिल कौन्सिलसमोर बॅरिकेड्स उभारण्यात आले. आंदोलक पुढे सरकताच पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. मात्र जमावाने पोलिसांचे वाहन जाळले आणि तोडफोड केली.