महाकुंभ मेळ्यात सेक्टर १७ मध्ये होणाऱ्या धर्मसभेत येणाऱ्या २७ जानेवारी रोजी सनातन बोर्डाचा मसुदा सादर केला जाणार आहे. हा दिवस 'धर्म स्वातंत्र्य दिन' म्हणून साजरा केला जाईल. अशी माहिती प्रसिद्ध आध्यात्मिक प्रवक्ते देवकीनंदन ठाकूर यांनी दिली आहे. ते गुरुवारी निरंजनी आखाड्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
देवकीनंदन ठाकूर म्हणाले, "आपला धर्म स्वतंत्र नाही. आपली मंदिरे सरकारांच्या ताब्यात आहेत, गुरुकुलं बंद आहेत आणि गौ माता रस्त्यावर भटकत आहे. आपला धर्म आणि संस्कृती जपण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला सनातन बोर्डाची आवश्यकता आहे."
देवकीनंदन ठाकूर पुढे म्हणाले, "या धार्म सभेत सर्व आखाड्यांचे प्रतिनिधी, चार शंकराचार्य आणि सनातन धर्माशी संबंधित प्रमुख लोक सहभागी होतील. तसेच, जोवर सरकार सनातन बोर्ड स्थापन करत नाही, तोवर आम्ही कुंभमेळ्यातून परतणार नाही," असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
जुनापीठाधीश्वर महंत स्वामी यतिंद्रानंद गिरी म्हणाले, "सनातन बोर्ड केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण मानवतेसाठी आवश्यक आहे. दहशतवाद, द्वेष आणि अराजक संपवण्याचा मार्ग केवळ सनातन धर्मातूनच जातो." निरंजनी आखाड्याचे ज्येष्ठ महामंडलेश्वर आणि उज्जैनमधील अर्जुन हनुमान मंदिराचे महंत स्वामी प्रेमानंद पुरी म्हणाले, "काही लोक गंगेची भूमी वक्फ बोर्डाची असल्याचा दावा करतात. त्यांनी हे समजून घ्यायला हवे की, सूर्याच्या उत्पत्तीपासून सनातन धर्म अस्तित्वात आहे. देशाचे अखंडत्व आबाधित राखण्यासाठी सनातन बोर्डाची स्थापना होणे अत्यंत आवश्यक आहे.