नवी दिल्ली - डोनाल्ड ट्रम्प भारताची थट्टा करतायेत, नरेंद्र मोदींची खिल्ली उडवत आहेत पण त्याला जाब विचारला जात नाही. आपल्या देशाचं सरकार चालवतंय कोण?, आज आपल्या देशाला पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्र्यांची गरज आहे. आज जे आहेत ते भाजपाचे प्रचारमंत्री आहेत असं सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परराष्ट्र धोरणावरून भाजपावर टीकास्त्र सोडलं
दिल्लीतील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर मोदी भारतात आले परंतु ते बिहारला प्रचाराला गेले. हे भाजपाचे प्रचारमंत्री आहेत. सरकारची परराष्ट्र धोरणे अपयशी ठरली आहेत. अमेरिका डोळे वटारत असताना पंतप्रधान चीनला चाललेत, मित्रासाठी दरवाजे उघडावे म्हणून जातायेत का हा प्रश्न आहे. परराष्ट्र धोरणात पूर्णपणे अपयशी ठरलेले हे सरकार आहे. आपले मित्र कोण हे सरकारने स्पष्ट करायला हवे. जगात अशी कुठली जागा नसेल तिथे आपले पंतप्रधान गेले नाहीत. पाकिस्तानशी जो संघर्ष आहे त्यामागे चीन असल्याचे बोलले जाते. मग आता चीनला का जात आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्याशिवाय पाकिस्तान शत्रू आहे की नाही? मग पाकसोबत क्रिकेट का खेळले जाते? दिवसेंदिवस सरकारचा बुरखा फाटत आहे. मणिपूर आजही जळतेय. भाजपा केवळ पक्ष फोडण्यामागे लागले आहे. देशाला मजबूत सरकार आणि मजबूत पंतप्रधानांची गरज आहे. आज देशाला मंत्री हवेत. जेव्हा देशावर आपत्ती येते तेव्हा हे लोक बेपत्ता होतात असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांना लगावला.
दरम्यान, सरकारला नीतिमत्ता राहिली नाही. जोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कुठलेही संबंध ठेवता कामा नयेत. पाकिस्तानशी क्रिकेट खेळता कामा नये असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. सुषमा स्वराज यांनीही अशीच भूमिका घेतली होती. परंतु आम्हाला देशप्रेमाचे धडे देणारे दुबईत पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळण्याची मजा बघतात. हे देशप्रेम असू शकत नाही. पाकिस्तानसोबत कुठलेही संबंध ठेवू नये. जे ठेवणार नाहीत ते सच्चे देशभक्त आहेत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.