मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील वीरपूर धरणामध्ये नुकताच एक अजब प्रकार दिसून आला. येथील वीरपूर धरणामध्ये एक मृतदेह तरंगताना आढळल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. गर्दीतील कुणीतरी याबाबतची खबर पोलिसांना दिली. परिस्थितीचं गांभीर्य विचारात घेऊन पोलीस पाणबुड्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांसोबत आलेले पाणबुडे मृतदेह बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरल्यावर हा मृतदेह हालचाल करू लागला. तसेच ज्याला लोक मृतदेह म्हणत होते, ती व्यक्ती अचानक उठून उभी राहिली. तसेच पाण्यातून बाहेर पडून पळून गेली. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले लोक अवाक् झाले.
हा संपूर्ण प्रकार पाहून पोलिसांनाही धक्का बसला. त्यांनी पळत जाणाऱ्या व्यक्तीला पकडले. तसेच त्याची चौकशी केली असता त्याने आपलं नाव टिंकू असल्याचं सांगितलं. रील बनवायचा असल्याने मी धरणाच्या पाण्यात मृतदेहासारखा पडून होतो, असे त्याने सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी टिंकू याला पकडून यापुढे असं कृत्य न करण्याची सक्त ताकीद दिली. तसेच पुन्हा असं काही केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला.