भारतीय सेनेने 'ऑपरेशन सिंदूर' आखून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरिदकेवर हल्लाबोल केला. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याचे मुरिदकेमधील लष्कर-ए-तोयबाचे मुख्य केंद्रच उडवले आहे. याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.
सेनेने उद्ध्वस्त केलेल्या याच मरकज तळावर अजमल कसाब आणि डेव्हिड कोलमन हेडली यांना दहशतवादी कारवाया शिकवण्यात आल्या होत्या. याच आतंकवाद्यांनी मुंबईत २६/११चा हल्ला केला होता. भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर आता पाकिस्तानातून अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. या व्हिडीओंमध्ये उद्ध्वस्त झालेली दहशतवादी तळं दिसत आहेत. नुकताच पाकिस्तानच्या मुरिदकेमधून एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय मरकजचा असल्याचे म्हटले जात आहे.
पाहा व्हिडीओ
दहशतवाद्यांच तळ जमीनदोस्त!
या व्हायरल व्हिडीओमध्ये रेस्क्यू गाड्या, रुग्णवाहिका उभ्या दिसत आहेत. तब्बल ८२ एकरात हाफिज सईदचे हे दहशतवादी प्रशिक्षण केंद्र होते. भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे हे तळ आता जवळपास नाहीसे झाले आहे. सर्वत्र मातीचे ढिगारे आणि तुटलेल्या इमारतीचा ढाचा दिसत आहे. या परिसरातील सगळ्याच इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या इमारतींमधील फर्निचरही जवळपास नष्ट झाले आहे. दहशतवाद्यांना जिथे आतंकवादी कारवाया करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते, ती ठिकाणं आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
ज्या ठिकाणाला पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे सर्वात मोठे केंद्र म्हटले जात होते, तिथे आता फक्त विनाश दिसत आहे. नष्ट झालेल्या इमारतींभोवती पाकिस्तानने लावलेले सील लेबल या विनाशाची कहाणी सांगत आहेत. हाफिज सईदच्या या मरकजची स्थापना २५ वर्षांपूर्वी झाली होती.