सामूहिक नेतृत्वाची कसोटी
By Admin | Updated: September 29, 2014 07:03 IST2014-09-29T07:03:11+5:302014-09-29T07:03:11+5:30
देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या काँग्रेसची भूमिका दीर्घकाळ निर्णायक असायची. आज काळ बदलला आहे.

सामूहिक नेतृत्वाची कसोटी
राजा माने -
देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या काँग्रेसची भूमिका दीर्घकाळ निर्णायक असायची. आज काळ बदलला आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी लाटेने राज्यातील काँग्रेसजनांना पुरते धुवून काढले. इतिहासात ज्या ज्यावेळी काँग्रेस अडचणीत आली त्या त्यावेळी राज्यातील जनता आणि यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांच्यासारखे नेते पक्षाच्या मदतीला धावून गेले. पक्षाला संकटमुक्त करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जनता लाटेतही १९७७ साली अर्स काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेसने पक्षांचा झेंडा विधानमंडळावर फडकाविला. १९७८ साली शरद पवार यांनी राज्यात ‘खंजीर’ आणि ‘पुलोद’चा ऐतिहासिक प्रयोग करून मुख्यमंत्रीपद खिशात टाकले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा एकूण बाजच बदलून गेला. तेव्हापासून काँग्रेस पक्षाची वाटचाल चढ-उतार पध्दतीने सुरू झाली. देशात काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणविला गेलेला महाराष्ट्र मतांच्या राजकारणात पक्षाला त्रासाचा ठरू लागला. १९९० नंतर तर काँग्रेस पक्षाला आमदारांच्या संख्येची शंभरी गाठणेही मुश्किल होऊ लागले. १९६० च्या दशकानंतर झालेल्या प्रत्येक पक्षफुटीने पक्षाची संघटनात्मक शक्ती आणि जनाधार क्षीण केला. शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाला जन्मी घातल्यानंतर तर महाराष्ट्रात केवळ आघाड्यांच्या राजकारणाचे पर्वच सुरू झाले. त्या पर्वाचा एका अर्थाने अस्त करण्याचे काम २०१४ च्या लोकसभा निवडणुकीने केले आणि जनाधाराचे माप राज्याने एकहाती नरेंद्र मोदींच्या पदरात टाकले! आता आघाड्यांचे पर्वच संपविण्याच्या मोहिमेची मुहूर्तमेढ भाजपने या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात रोवली आहे. काँग्रेस आघाडीही फुटून त्याच मोहिमेत सहभागी झाली आहे. आता आजवर सहकार, शेती, उद्योग क्षेत्राबरोबरच धर्मनिरपेक्षतेचा वसा घेत सर्व स्तरातील व जातीधर्मातील पददलितांसाठी केलेल्या कामाची जंत्री घेऊन काँग्रेस नव्या पर्वातील निवडणुकीला सामोरी जात आहे.
राज्याच्या निर्मितीनंतर देशात पहिल्या क्रमांकावर राज्याला ठेवण्याचा पक्षाने केलेला विक्रम पक्षाचे नेते जनतेच्या गळी आता कसे उतरविणार? पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, अशोक चव्हाण,पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील ही नेते मंडळी लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार झालेल्या जनतेला केलेल्या कामाची महती कशी पटवून देणार? राज्याने केलेल्या चौफेर प्रगतीचा पाढा जनतेपुढे किती प्रभावीपणे वाचणार? या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे मिळविणे, हीच काँग्रेस नेतृत्त्वाची अग्निपरीक्षा आहे.
नारायण राणे
शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नारायण राणे हे महाराष्ट्रातील प्रभावी नेते आहेत. सध्या उद्योगमंत्री असलेल्या राणे यांनी शिवसेनेच्या सत्ताकाळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. आपल्या प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्वामुळे कोकणातील शिवसेनेचा मतदार त्यांनी काँग्रेसकडे वळविला.
पृथ्वीराज चव्हाण
स्वच्छ प्रतिमा आणि उत्तम प्रशासन कौशल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी निष्कलंक मुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. अभियंता असलेल्या चव्हाण यांनी राजीव गांधी यांच्या आग्रहाखातर राजकारणात प्रवेश केला. पंतप्रधान कार्यालयाच्या मंत्रिपदावर त्यांनी उत्तमपणे काम केले.
सुशीलकुमार शिंदे
दलित कुटुंबातून आलेले सुशीलकुमार शिंदे देशातील प्रभावशाली नेते आहेत. उत्तम संघटन कौशल्य, प्रशासक म्हणून शिंदे यांचा लौकिक आहे. महाराष्ट्रात सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. राज्याचे मुख्यमंत्रिपद, केंद्रीय गृहमंत्रीपद त्यांनी भूषविले आहे.
बाळासाहेब थोरात
संगमनेर तालुक्यातील असलेले बाळासाहेब थोरात यांनी आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. सहकाराची चळवळ प्रभावीपणे राबविली. कृषी, जलसंधारण, शालेय शिक्षण या खात्यांचे मंत्रिपद त्यांनी भूषविले.
विजय दर्डा : विदर्भातील प्रभावशाली काँग्रेस नेत्यांमध्ये खासदार विजय दर्डा यांचे महत्त्वाचे स्थान आहे. राज्यसभेवर सलग तीन वेळा ते निवडून गेले आहेत. केंद्र सरकारच्या विविध समित्यांचे ते सदस्य आहेत.
विलास मुत्तेमवार : विलास मुत्तेमवार हे विदर्भातील सर्वसामान्य नागरिकांवर प्रभाव असलेले नेते आहेत. केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र पदभाराचे राज्यमंत्रिपदही त्यांनी भूषविले होते. सध्या ते स्वतंत्र विदर्भ आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. नागपूरमधील मिहान प्रकल्पाचे ते अध्वर्यू आहेत.
मुकुल वासनिक : मुकुल बाळकृष्ण वासनिक या नेत्याचाही विदर्भात प्रभाव आहे. यापूर्वी त्यांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सरचिटणीस आहेत. त्यांनी केंद्रामध्ये सामाजिक न्याय खात्याचे मंत्रिपद भूषविले होते.
नितीन राऊत : नितीन राऊत हे नागपूरमधील काँग्रेसचे प्रभावी नेते आहेत. महाराष्ट्र सरकारमध्ये जलसंवर्धन आणि रोजगार हमी योजना मंत्रीपदाची जबाबदारी डॉ. राऊत यांनी पार पाडली. नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा ते विजयी झाले आहेत. सामाजिक न्यायासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले असून गोरगरीब, दिन दलितांसाठी त्यांनी अनेकदा संघर्ष केला आहे. चळवळीतील नेतृत्व आहे.
बाळासाहेब विखे-पाटील : अहमदनगर जिल्ह्यातील या नेत्याने सहकाराच्या माध्यमातून जनतेवर प्रभाव पाडला. लोकसभेत त्यांनी कोपरगावचे प्रतिनिधित्व केले होते. सहकाराबरोबरच कृषी, अर्थ आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे.
रोहिदास पाटील : रोहिदास पाटील हे उत्तर महाराष्ट्रातील प्रभावी नेते आहेत. महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. शिवाय राज्य सरकारमध्ये विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.
अशोक चव्हाण : शंकरराव चव्हाण यांचा वारसा घेऊन आलेल्या अशोकरावांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविले होते. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होता. उत्तम प्रशासकीय कौशल्य आणि जनसंघटन ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्ये आहेत.
पतंगराव कदम : पतंगराव कदम यांचाही जनतेवर मोठा प्रभाव आहे. महाराष्ट्र शासनामध्ये त्यांनी वन तसेच मदत व पुनर्वसन खात्याची जबाबदारी सांभाळली. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून त्यांचे नाव अनेक वेळा पुढे आले आहे.
राजेंद्र दर्डा : महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेले राजेंद्र दर्डा हे मराठवाड्यातील प्रभावशाली नेते आहेत. प्रभावी प्रशासन कौशल्यामुळे त्यांनी मंत्री म्हणून ठसा उमटविला आहे.
जनार्दन चांदूरकर : मुंबई प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष असलेले जनार्दन चांदूरकर हे मुंबईतील काँग्रेसचे प्रभावशाली दलित नेते आहेत. ज्येष्ठ विधिज्ञ आणि व्यासंगी प्राध्यापक म्हणून मुंबईत त्यांनी ख्याती मिळविली होती. राजकारणातही काँग्रेसचे बुद्घीवादी नेते म्हणून त्यांचा सन्मान केला जातो.
हर्षवर्धन पाटील : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून आलेले पाटील संघटन कौशल्यामुळे अल्पावधीतच प्रभावशाली नेते बनले. सुरुवातीला अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर ते स्वगृही दाखल झाले. वेगवेगळ्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदे भूषविली. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणूनही त्यांचे नाव पुढे आले.
गुरुदास कामत : गुरुदास कामत यांनी ‘एनएसयूआय’ या विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यास प्रारंभ केला. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून त्यांनी पाच वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली होती. संघटनेवर प्रभाव टाकणारे व्यक्तीमत्व.
मुरली देवरा : उद्योजक असलेले मुरली देवरा हे सामाजिक कार्याच्या माध्यमातून राजकारणात आले. मुंबई महापालिकेच्या नगरसेवकापासून केंद्रातील मंत्रिपदापर्यंत त्यांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत गेला. मुंबईच्या जनतेवर त्यांचा प्रभाव आहे.