कायद्यातून सुटण्यासाठी दहशतवाद्यांची नवी क्लृप्ती
By Admin | Updated: July 14, 2014 00:45 IST2014-07-14T00:45:22+5:302014-07-14T00:45:22+5:30
सुरक्षा दलाने पकडले, तर वय १८ च्या खाली सांगा व स्वत:ची सुटका करून घ्या, असा नवा मंत्र लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमध्ये लढणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

कायद्यातून सुटण्यासाठी दहशतवाद्यांची नवी क्लृप्ती
श्रीनगर/नवी दिल्ली : सुरक्षा दलाने पकडले, तर वय १८ च्या खाली सांगा व स्वत:ची सुटका करून घ्या, असा नवा मंत्र लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमध्ये लढणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
लष्कर-ए-तोयबाच्या या नव्या कल्पनेची माहिती मोहंमद नवीद जट ऊर्फ अबू हंजाला याने दिली. जट याने त्याचे वय १७ च्या खालचे असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याचे नक्की वय कळण्यासाठी वय ठरविण्याची चाचणी घेण्यात आली. त्यात त्याचे वय २२ असल्याचे स्पष्ट झाले. त्यावर त्याने आपल्या पाकिस्तानी मालकांनी वय १७ असल्याचे सांगण्यास बजावले होते असे म्हटले आहे.
अल्पवयीन मुलांसाठी असणाऱ्या कायद्याप्रमाणे जास्तीत जास्त ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते. जट हा पाकिस्तानातील मुलतान येथील रहिवासी आहे. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पोलिसांनी त्याला दक्षिण काश्मीर येथे अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार आपल्या सहा सहकाऱ्यांसह तो आॅक्टोबर २०१२ मध्ये उत्तर काश्मीरमधील केरन सेक्टरमधून भारतात आला होता. त्याचे वडील लष्करातील निवृत्त वाहनचालक आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)