जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथील त्रालच्या नादेर भागात सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मारल्या गेलेल्या तीन जैश दहशतवाद्यांची नावं समोर आली आहे. याच दरम्यान, चकमकीत मारला गेलेला आमिर नजीर वानीचा एक व्हिडीओ समोर आला. ज्यामध्ये आमिर त्याच्या कुटुंबाशी व्हिडीओ कॉलवर बोलत असल्याचं दिसत आहे. दहशतवाद्याने त्याच्या आईला चकमकीआधी व्हिडीओ कॉल केला. आमिरची आई त्याला सरेंडर करण्यास सांगत आहे पण आमिर म्हणतो की सैन्याला पुढे येऊ दे मग मी बघतो.
आईसोबतच्या व्हिडिओ कॉलच्या स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये असं दिसतं की, आमिरची आई त्याला "बेटा, सरेंडर कर" असं म्हणत आहे, परंतु तो त्याच्या आईचं अजिबात ऐकत नाही आणि सैन्यावर गोळीबार करतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना या दहशतवाद्यांनी सरेंडर करायला सांगितलं होतं. पण त्यांनी गोळीबार सुरू केला. शेवटी आमिर सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारला गेला.
काश्मीरमधील अवंतीपुरा येथील नादेर त्राल भागात दहशतवादी असल्याची विश्वसनीय माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दल परिसरात शोध घेत असताना, लपलेल्या दहशतवाद्यांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी लगेचच चोख प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली. सुरक्षा दलांनी चकमकीत तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला जे जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी होते.
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
त्रालमध्ये अजूनही गोळीबार सुरू आहे. लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. याच दरम्यान त्राल चकमकीचा ड्रोन व्हिडीओ समोर आला आहे. या ड्रोन फुटेजमध्ये एक दहशतवादी लपलेले दिसत आहेत. जैशच्या दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती पाहायला मिळत आहे. दुसऱ्या फुटेजमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा होताना दिसत आहे. आणखी दहशतवादी अजूनही लपले असण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे सर्वजण त्रालचे रहिवासी आहेत. आसिफ अहमद शेख, आमिर नजीर वानी आणि यावर अहमद बट्ट अशी त्यांची नावं आहेत.