पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान म्हणाले की, हा १४० कोटी लोकांसाठी आनंदाचा क्षण आहे. देश एकतेची भावना सातत्याने मजबूत करत आहे. वाळवंट असो, हिमालय असो, समुद्रकिनारा असो किंवा दाट लोकवस्तीचा भाग असो, भारताच्या प्रत्येक घरात आज तिरंगा फडकवला जात आहे. सर्वत्र एकच भावना आहे की, 'आपल्या प्राणांपेक्षा प्रिय असलेल्या या भूमीला आमचे वंदन आहे.'
पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले की, “आज १५ ऑगस्टचे विशेष महत्त्व आहे. आज मला लाल किल्ल्यावरून ‘ऑपरेशन सिंदूर’मधील वीर जवानांना सलाम करण्याची संधी मिळाली. या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कृत्याची शिक्षा दिली. पहलगाममध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी लोकांचा धर्म विचारून त्यांची हत्या केली. पत्नीसमोर पतीला आणि मुलांसमोर वडिलांना ठार मारले. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती आणि जगालाही या हल्ल्याने धक्का बसला होता.”
ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख केला. ते म्हणाले की, "'ऑपरेशन सिंदूर' ही आपल्या देशातील लोकांच्या रागाची प्रतिक्रिया होती. २२ एप्रिलनंतर लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आली. रणनीती, निशाणे आणि वेळ लष्करानेच ठरवावी, अशा सूचना दिल्या गेल्या. आणि आमच्या लष्कराने ते करून दाखवले, जे अनेक दशकांपासून शक्य झाले नव्हते. शेकडो किलोमीटर आत घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानची अजूनही झोप उडलेली आहे."
"पाकिस्तानमध्ये झालेली ही विध्वंसक कारवाई इतकी मोठी आहे की, दररोज नवीन माहिती आणि खुलासे समोर येत आहेत. आपण अनेक दशकांपासून दहशतवादाचा सामना करत आहोत आणि आपल्या देशाची छाती अनेकदा छिन्नविछिन्न झाली आहे. पण आता आम्ही एक 'न्यू नॉर्मल' स्थापित केले आहे. आता आम्ही दहशतवादी आणि त्यांना आश्रय व ताकद देणाऱ्यांना वेगळे मानणार नाही.
अणुहल्ल्याच्या धमकीवर पाकिस्तानला सडेतोड उत्तर
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अलीकडेच अणुहल्ल्याची धमकी दिली होती. यावर पंतप्रधान मोदींनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की, “भारत आता अणुहल्ल्याची धमकी सहन करणार नाही. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार खूप काळापासून सुरू आहे, पण आता तो खपवून घेतला जाणार नाही. जर असे प्रयत्न पुढेही सुरू राहिले, तर आमचे सैन्य आपल्या पद्धतीने त्याला उत्तर देईल. लष्कराने ठरवलेल्या वेळेनुसार, पद्धतीनुसार आणि उद्दिष्टांनुसार आम्ही कारवाई करू आणि त्यांना जोरदार प्रत्युत्तर देऊ. आता रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. देशाला आता समजले आहे की सिंधू नदीचा करार किती अन्यायकारक आणि एकतर्फी आहे. भारतातून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी शत्रूंच्या शेतांचे सिंचन करते आणि माझ्या देशाची जमीन मात्र पाण्यावाचून तहानलेली आहे. हा कसला करार होता?”, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.