लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आंतरराष्ट्रीय सीमेवर अखनूरजवळ पाकिस्तानच्या हद्दीत असलेला दहशतवाद्यांचा तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. या भागात पाकिस्तानी सैनिकांनी चालवलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना बीएसएफने ही कारवाई केली.
शुक्रवारी रात्री पाकिस्तानने जम्मू सेक्टरमध्ये विनाकारण गोळीबार चालवला होता. यावेळी बीएसएफने चोख प्रत्युत्तर देत आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांच्या चौक्यांवर हल्ले केले. यात शत्रूपक्षाचे प्रचंड नुकसान झाले. या कारवाईदरम्यान बीएसएफने सियालकोट जिल्ह्यात असलेल्या लुनी येथील दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. भारताने शनिवारी पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानमधील अखनूरजवळील दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे.
मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री अब्दुल्लांनी जाहीर केली मदत
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीर भागात पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांना प्रत्येक १० लाख रुपयांची मदत जाहीर केली. ७ मे रोजी भारताने सीमापार दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानने गेल्या चार दिवसांपासून पूंछ, राजोरी, जम्मू आणि बारामुल्ला भागात गोळीबार सुरू केला आहे. यात एका प्रशासकीय अधिकाऱ्यासह १९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
श्रीनगर हादरले
सीमेवर पाकिस्तानी हद्दीतून शनिवारी क्षेपणास्त्रसदृश वस्तू दल सरोवरात पडली आणि याच वेळी स्फोटाचा मोठा आवाज झाला आणि पाण्यावर धुराचे लोट उठले. बॉम्बनाशक पथके तत्काळ घटनास्थळी रवाना झाली. सुरक्षा दलांनीही या भागात शोधमोहीम सुरू केली आहे.