दहशतवादी हल्ला; २० शहीद

By Admin | Updated: June 5, 2015 02:02 IST2015-06-05T02:02:01+5:302015-06-05T02:02:01+5:30

मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात गुरुवारी सकाळी लष्कराच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी घात लावून केलेल्या भीषण हल्ल्यात २० जवान शहीद तर १० जखमी झाले.

Terrorist attacks; 20 martyrs | दहशतवादी हल्ला; २० शहीद

दहशतवादी हल्ला; २० शहीद

स्फोट व अंधाधुंद गोळीबार : पीपल्स लिबरेशन आर्मीवर संशय, ‘एएफएसपीए’ कायदा लागूच
इम्फाळ/दिल्ली : मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात गुरुवारी सकाळी लष्कराच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी घात लावून केलेल्या भीषण हल्ल्यात २० जवान शहीद तर १० जखमी झाले. मागील काही वर्षांतील हा सर्वांत मोठा हल्ला आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या भ्याड हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली आहे.
सहा-डोगरा रेजिमेंटचे एक पथक येथून जवळपास ८० किमी अंतरावरील तेंगनोपाल-न्यू समतल मार्गावर नियमित गस्तीवर असताना सकाळी ९ वाजता पारालोंग आणि चारोंग गावाच्या दरम्यान एका अज्ञात दहशतवादी संघटनेने घात लावून प्रथम भूसुरुंग स्फोट घडविला. त्यानंतर लष्कराच्या या चार वाहनांवर त्यांनी रॉकेटचलित ग्रेनेडस् (आरपीजी) आणि स्वयंचलित शस्त्रांनी अंधाधुंद गोळीबार केला, अशी माहिती इम्फाळमधील पोलीस अधिकाऱ्याने दिली.
या हल्ल्यात लष्कराचे २० जवान शहीद तर ११ जखमी झाले, असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल रोहन आनंद यांनी नवी दिल्ली येथे सांगितले. एक संशयित दहशतवादी ठार झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मणिपूरचे गृहसचिव जे. सुरेशबाबू यांनी या भीषण हल्ल्यामागे राज्यातील बंडखोर संघटना पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)चा हात असण्याचा संशय व्यक्त केला आहे. हे कृत्य पीएलएचे असून, त्याला केवायकेएलने साथ दिली असावी. अद्याप अधिक माहितीच्या प्रतीक्षेत आहोत, असे त्यांनी सांगितले. कांग्लेई यावोल कन्ना लुप ही मणिपुरातील मेईती क्रांतिकारी संघटना आहे. हल्लेखोर बंडखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाचा ताफा घटनास्थळी रवाना झाला आहे. (वृत्तसंस्था)

शहिदांना मोदींचे वंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यास ‘अविचारी’ आणि ‘क्लेषदायी’ असे संबोधले. देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर जवानांना माझे मान झुकवून वंदन, असेही त्यांनी नमूद केले.

मनोहर पर्रीकर यांच्याकडून निषेध
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लष्करावरील या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून, राज्यात शांतता आणि सामान्य परिस्थिती निर्माण करण्याच्या दिशेने लष्कराचे कार्य यापुढेही सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. संरक्षणमंत्र्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात सांगण्यात आले.

हल्ल्यामागचे कारण
या हल्ल्यामागे नेमकी कोणती संघटना आहे व त्यामागे कारण काय, हे लगेच स्पष्ट झाले नसले तरी गेल्या आठवड्यात लष्कराच्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला त्याचा सूड घेण्यासाठी हा हल्ला झाला असावा, असे मानले जात आहे. या गोळीबारानंतर चंदेल जिल्ह्यात कडकडीत हरताळ पाळण्यात आला होता.

सरकारची कठोर भूमिका
नरेंद्र मोदी सरकारने कठोर भूमिका घेतली असून, ईशान्येकडील राज्यांमधील फुटीरवादी संघटनांशी कोणत्याही प्रकारची बोलणी केली जाणार नाहीत, असे गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी जाहीर केले. त्रिपुरा वगळता संपूर्ण ईशान्य राज्यांमध्ये लष्करास विशेष अधिकार देणारा ‘एएफएसपीए’ कायदा यापुढेही लागूच राहील, असेही त्यांनी सांगितले. त्रिपुरात
२७ मेपासून हा कायदा मागे घेण्यात आला आहे.

Web Title: Terrorist attacks; 20 martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.