जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे एअर फोर्सच्या ताफ्यावर शनिवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला.
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
पुंछ: जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे एअर फोर्सच्या ताफ्यावर शनिवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ५ जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर आले होते आणि त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. पण, आताच हाती आलेल्या बातमीनुसार हे पाचपैकी एक जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर येत आहे. यापैकी एका जवानाची प्रकृती अजूनही गंभीर असून तिघांची प्रकृती ठिक असल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. या हल्ल्यानंतर स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली आहे. शाहसीतार जवळील जनरल परिसरात हवाई तळाच्या आत वाहने सुरक्षित करण्यात आल्याचे सुरक्षा दलातील अधिकाऱ्याने सांगितले. पुंछमध्ये दहशतवाद्यांचे पुन्हा एकदा भ्याड कृत्य समोर आले. सुरणकोट गावात दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या दोन वाहनांवर गोळीबार केला. या घटनेत हवाई दलाचे ५ जवान जखमी झाले होते. गोळीबाराची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले की, जम्मू-काश्मीरच्या पुंछ येथे वायुसेनेच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी फायरिंग केल्याची घटना धक्कादायक आणि निंदनीय आहे. ह्या हल्ल्यात आपले अनेक जवान जखमी झाल्याची बातमी आहे. त्या जवानांना लवकरात लवकर आराम पडो, अशी देवाचरणी प्रार्थना करतो. हल्लेखोरांना कणखर प्रत्युत्तर मिळेल, अशी अपेक्षा करतो. आपल्या सैन्यदलावर हल्ला झालाच कसा, ह्याची सखोल चौकशी व्हावी; अशी केंद्र सरकारकडे मागणी करतो.