दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, संशयिताला अटक
By Admin | Updated: July 29, 2014 17:15 IST2014-07-29T11:37:07+5:302014-07-29T17:15:34+5:30
दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अब्दूल सुभान कुरेशी या संशयित दहशतवाद्याला सोमवारी रात्री अटक केली आहे.

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, संशयिताला अटक
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २९ - दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अब्दूल सुभान कुरेशी या संशयित दहशतवाद्याला सोमवारी रात्री अटक केली आहे. कुरेशीचा लष्कर ए तोयबाशी संबंध असल्याचे सांगितले जात असून हरियाणा, बिहार आणि राजस्थानमधील तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये आणण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आली होती.
हरियाणातील मेवात येथून काही महिन्यांपूर्वी दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या दोघांनी चौकशी दरम्यान अब्दूल सुभान कुरेशीच्या नावाचा उल्लेख केला होता. तेव्हापासून दिल्ली पोलिसांचे पथक कुरेशीच्या मागावर होते. सोमवारी रात्री सुभान कुरेशी (वय ४२) दिल्लीतील बस स्थानकावर आला असता पोलिसांनी त्याला अटक केली. सुभान लष्कर ए तोयबात दाखल होण्यासाठी तरुणांना तयार करायचा. पाकिस्तानमध्ये लपलेला दहशतवादी जावेद बलूचीशी तो नियमित संपर्कात होता. मुजफ्फरनगरमधील दंगलग्रस्त तरुणांचे ब्रेनवॉश करुन त्यांना दहशतवादी संघटनेत दाखल करुन घेण्याची जबाबदारी सुभान कुरेशीकडे सोपवण्यात आली होती. लष्करने भारतातील विविध भागांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचला होता अशी माहितीही तपासा दरम्यान उघड झाली आहे.