उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील कोतवाली देहात क्षेत्रातील दौलतपूर गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. राजकुमार नावाच्या एका मजुराने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चक्क आपल्या पत्नीला तिच्या बॉयफ्रेंडच्या स्वाधीन केलं.
राजकुमारचं लग्न सात वर्षांपूर्वी झालं होतं. मात्र काही काळापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या पत्नीची एका तरुणाशी मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. जेव्हा राजकुमारला या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली आणि त्याने विरोध केला, तेव्हा पत्नीने त्याला 'निळ्या ड्रममध्ये सिमेंट भरून मारून टाकू' अशी धमकी दिली. या धमकीमुळे राजकुमार इतका हादरला की हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले.
राजकुमारला पत्नीच्या मोबाईलमध्ये तिचे बॉयफ्रेंडसोबतचे काही आक्षेपार्ह फोटो सापडले होते. तेव्हापासून घरात रोज भांडणं होऊ लागली. पत्नी केवळ राजकुमारलाच नव्हे, तर त्याच्या भावांनाही जीवे मारण्याची धमकी देऊ लागली. 'निळ्या ड्रम'च्या धमकीने राजकुमारच्या मनात प्रचंड दहशत निर्माण केली होती. राजकुमारला एक लहान मूलही आहे, पण स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जीवाचा धोका ओळखून त्याने या नात्यातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला.
पोलिसांनी दोन्ही बाजूंना समुपदेशनासाठी महिला मेडिएशन सेलमध्ये बोलावलं होतं. तिथे पत्नीचा बॉयफ्रेंडही हजर झाला. तिन्ही कुटुंबांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. चर्चेदरम्यान पत्नीने स्पष्टपणे सांगितलं की, तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबतच राहायचं आहे. अखेर राजकुमार आणि त्याच्या कुटुंबीयांनी संमती दिली आणि पत्नीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पाठवलं. "असा निर्णय घेऊन मी माझा जीव वाचवला आहे" अशी भावना राजकुमारने व्यक्त केली आहे.