७२ जणांच्या 'घर वापसी'मुळे चर्चचे झाले मंदिर
By Admin | Updated: August 28, 2014 11:54 IST2014-08-28T10:22:10+5:302014-08-28T11:54:28+5:30
अलीगढमधील ७२ जणांच्या 'घर वापसी'मुळे एका रात्रीत गावातील चर्चचे मंदिरमध्ये रुपांतर झाले आहे. मात्र या घटनेमुळे अलीगढमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.

७२ जणांच्या 'घर वापसी'मुळे चर्चचे झाले मंदिर
ऑनलाइन लोकमत
अलीगढ, दि. २८ - अलीगढमधील ७२ जणांच्या 'घर वापसी'मुळे एका रात्रीत गावातील चर्चचे मंदिरमध्ये रुपांतर झाले आहे. एका हिंदूत्ववादी गटाने चर्चवरील क्रॉसचे चिन्ह हटवले असून चर्चच्या आतमध्ये आता शंकराच्या मूर्तिची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
अलीगढमधील असरोई गावातील ग्रामस्थांनी १९९५ मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. या ७२ जणांनी बुधवारी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आहे. याविषयी संघ प्रचारक आणि धर्म जागरण विवादचे प्रमुख खेम चंद्रा म्हणाले, हे धर्मांतर नसून 'घर वापसी' आहे. त्यांनी स्वेच्छेने काही वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आता त्यांना त्यांची चूक समजल्याने त्यांनी पुह्ना हिंदू धर्म स्वीकारला आहे. या ग्रामस्थांनी हिंदू धर्म स्वीकारताच एका हिंदूत्ववादी गटाने गावातील चर्चवरील क्रॉसचे चिन्ह हटवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच चर्चमध्ये आता शंकराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करुन चर्चचे मंदिरमध्ये रुपांतर करण्यात आल्याचे समजते. या घटनेमुळे अलीगढमध्यी पुन्हा एकदा तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.
हिंदू धर्मातील जातपद्धतीला कंटाळून आम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पण तिथेही आमच्याकडे दुर्लक्षच झाले त्यामुळे आम्ही पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला असे ग्रामस्थ अनिल गौर यांनी सांगितले. ख्रिश्चन समुदायाचे धार्मिक नेते व वकिल ओसमोंड चार्ल्स यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. 'घर वापसी'मागे आम्हाला षडयंत्र वाटत आहे. कधी आम्ही लव्ह जिहाद ऐकतो तर कधी घर वापसी. भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहे का ? असा सवालही चार्ल्स यांनी उपस्थित केला आहे.