पाटणा : बिहारच्या निवडणुका जवळ येत असतानाच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि केंद्र सरकार यांच्यावर १२ प्रश्नांच्या फैरी झाडल्या असून, त्याची उत्तरे मागितली आहेत.
तेजस्वी यांनी म्हटले की, नितीशकुमार दोन दशकांच्या राजवटीत आणि केंद्रातील भाजपच्या एका दशकाहून अधिक काळाच्या राजवटीत बिहारमध्ये बेरोजगारीसह अनेक प्रश्न कायम आहेत. राज्याचे दरडोई उत्पन्न अजूनही युगांडा, रवांडासारख्या गरीब देशांपेक्षा कमी आहे.
१) उद्योगांशिवाय शेती : बिहारमध्ये अन्न प्रक्रिया उद्योग का उभारले नाहीत?
२) बेरोजगारीची स्थिती : बिहार बेरोजगारीचे केंद्र का राहिले? आयटी कंपन्यांना का आमंत्रित केले नाही?
३) मत्स्यपालनाची दुर्दशा : मस्त्यपालनासाठी संसाधने असूनही इतर राज्यांतून मासे खरेदी का?
४) दुग्ध उद्योग का नाहीत? : राज्यातून देशभरात तूप, लोणी, चीज, खवा आणि पनीर का जात नाही?
५) औद्योगिक क्लस्टरचे घोडे कुठे अडले? : सरकारने स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग क्लस्टर का तयार केले नाही?
६) पारंपरिक उद्योगांची घसरण : पारंपरिक कामगारांसाठी काय केले?
७) पर्यटन कुठे? : बिहार प्रमुख पर्यटन केंद्र का झाले नाही?
८) परीक्षा आणि पारदर्शकता : पारदर्शकतेचा अभाव का आहे?
९) स्थलांतर : मागील २० वर्षांत किती लोकांनी बिहार सोडले?
१०) कारखाने का बंद? :किती कारखाने बंद पडले? किती नोकऱ्या गेल्या?
११) पैसा राज्याबाहेर? : शिक्षणासाठी किती पैसा राज्याबाहेर पाठवला गेला?
१२) मानवी संसाधने वाया गेली : किती टक्के कामगारांना राज्याबाहेर काम करण्यास भाग पाडले गेले?