तीस्ता सेटलवाड यांच्या अटकेस तूर्तास मनाई
By Admin | Updated: February 13, 2015 01:14 IST2015-02-13T01:14:07+5:302015-02-13T01:14:07+5:30
गुलबर्ग सोसायटीचा निधी कथितरीत्या हडप केल्याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने एक दिवसाचा दिलासा

तीस्ता सेटलवाड यांच्या अटकेस तूर्तास मनाई
अहमदाबाद / नवी दिल्ली: सन २००२ च्या गुजरात दंगलीत उध्वस्त झालेल्या गुलबर्ग सोसायटीचा निधी कथितरीत्या हडप केल्याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने एक दिवसाचा दिलासा दिला़
गुजरात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळताच सेटलवाड व त्यांच्या पतीने लगेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सरन्यायाधीश एच़एल़ दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमक्ष सेटलवाड यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी त्यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्याची विनंती केली़ पोलीस कुठल्याही क्षणी त्यांना अटक करू शकतात़ ही एक असामान्य स्थिती असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले़ यानंतर सर्वोच्च न्यायालयाने संबंधित याचिकेवर उद्या सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले़ तसेच तोपर्यंत सेटलवाड यांच्या अटकेला स्थगिती दिली़
आरोपींकडून तपासात सहकार्य मिळत नसल्याने आणि सर्वांनी गुलबर्ग सोसायटीचा निधी खासगी कामांसाठी खर्च केल्याचे प्रथमदृष्ट्या दिसत असल्याचे नमूद करून गुजरात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर अहमदाबाद पोलिसांनी सेटलवाड व त्यांच्या पतीचा शोध सुरू केला होता़ त्यांचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी मुंबई पोलिसांची मदतही मागण्यात आली होती़ सेटलवाड व त्यांचे पती मुंबईतील जुहू भागात वास्तव्यास आहेत़
गुजरात दंगलीदरम्यान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या गुलबर्ग सोसायटीत एक संग्रहालय उभारण्याच्या इराद्याने कोट्यवधी रुपयांचा निधी उभारण्यात आला होता़ २००६ मध्ये गुलबर्ग सोसायटीत ‘म्यूजियम आॅफ रेजिसटेन्स’ बनविण्याचा निर्णय झाला होता.